मिरकरवाडा, राजीवडा, जयगड बंदरात बेकायदेशीर LED दिवे लावून मासेमारी सुरू; मच्छिमारांचा कायदा हातात घेण्याचा इशारा

रत्नागिरी : प्रतिनिधी

मिरकरवाडा, राजीवडा, जयगड, नाटे आणि इतर बंदरामध्ये शेकडो बेकायदेशीर नौका मत्स्यखात्याचा कुठलाही परवाना न घेता एलईडी दिवे लावून पर्ससीन नेट मासेमारी करत आहेत. या नौकांवर कारवाई करावी अशी मागणी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेने मत्स्यव्यवसाय सहाय्यक आयुक्तांकडे करताना बेकायदेशीर नौकांची छायाचित्रेही दिली आहेत.

दिलेल्या निवेदनामध्ये ट्रॉलींग परवाना असलेल्या नौकांबाबत आपल्या नौकेबाबत पर्ससीन नेट, बूम, एलईडी दिवे व इतर पर्ससीन सामुग्री वापरून बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. तसेच 70 ते 80 पर्ससीन नेट नौका परवाना नसताना बेकायदेशीर मासेमारी करत आहेत. ही बेकायदेशीर मासेमारी लवकरात लवकर बंद करण्यात यावी.

पर्ससीन नेट मासेमारीमुळे शाश्वत मच्छिमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. जर मत्स्य व्यवसाय कार्यालयाकडून बेकायदेशीर मासेमारीवर कारवाई होणार नसेल तर ती बेकायदेशीर मासेमारी थांबवण्यासाठी आम्ही शाश्वत मच्छिमार कायदा हातात घ्यायला तयार आहोत. मात्र पुढे होणाऱ्या परिणामांना मत्स्य व्यवसाय विभाग जबाबदार असेल असा इशारा देण्यात आला आहे. सर्व नौकांवरील बूम तात्काळ उतरवावेत अशी मागणी करण्यात आली.

यावेळी रत्नागिरी तालुका शाश्वत मच्छिमार हक्क संघटनेचे अध्यक्ष रणजीत भाटकर, दत्तगुरू कीर, विरेंद्र नार्वेकर, अमरेश भाटकर, कंचू मयेकर, रोहिदास पालकर उपस्थित होते.

टिप्पण्या