हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये जोरदार हिमवृष्टी

नवी दिल्ली :-  देशातील हिमाचल प्रदेश, जम्मू- काश्मीर आणि उत्तराखंडमध्ये मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत आहे. हिमाचल प्रदेशातील ७ जिल्ह्यांत हिमवादळाचा फटका बसला आहे. मोठ्या प्रमाणावर हिमवृष्टी होत असल्याने एनएच-३ या महामार्गासह हिमाचलमधील ३८० रस्ते बंद आहेत. हिमवृष्टीचा सर्वाधिक फटका लाहौल स्पीती जिल्ह्याला बसला आहे. येथील सुमारे १८२ रस्ते बंद आहेत.

       सिमलाचे कमाल तापमान १३ अंश सेल्सिअस घसरून ४ सेल्सिअसपर्यंत खाली आले आहे. जम्मू-काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे श्रीनगर-जम्मू महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. राज्यात ३० जानेवारीपर्यंत हिमवर्षाव होण्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. दुसरीकडे उत्तराखंडमधील चमौलीमध्ये हिमवृष्टीमुळे रस्ते बंद झाले आहेत.

उत्तरकाशीतील गंगोत्री मंदिरावर बर्फाची चादर पसरली आहे. काही ठिकाणी पाऊसही पडला आहे. येत्या काळात हिमवर्षाव सुरूच राहणार असून आणखी थंडी पडण्याचा इशारा देण्यात आला आहे. उत्तर भारतातील बिहार, राजस्थान, मध्यप्रदेश आणि उत्तर प्रदेशा या राज्यांतील तापमान गेल्या काही दिवसांपासून खूपच घसरले असून कडाक्याच्या थंडीचा मोठ्या प्रमाणावर परिणाम झाला आहे.

टिप्पण्या