लोककला महोत्सवाच्या मंडप उभारणीचा बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते शुभारंभ
चिपळूण: येथील लोकमान्य टिळक स्मारक वाचन मंदिराच्या अरविंद जाधव अपरांत संशोधन केंद्राच्या वतीने आयोजित केलेल्या ५, ६, ७, ८ फेब्रुवारी २०२३ दरम्यान संपन्न होणाऱ्या पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवाच्या मंडप उभारणीचा शुभारंभ आज (मंगळवार दि. २४) दुपारी बाळासाहेबांची शिवसेना पक्षाचे उपनेते व माजी आमदार सदानंद चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला. श्रीजुना कालभैरव मंदिर ट्रस्ट अंतर्गत कै. बापू बाबाजी सागावकर मैदानात हा महोत्सव होणार आहे.
कोकण ही निसर्गसंपन्न भूमी आहे. कोकणाला लाभलेला अथांग समुद्र किनारा, गर्द वनराई, गिरीदुर्ग, प्राचीन मंदिरे, कोकणात मिळणारे वैविध्यपूर्ण खाद्यपदार्थ, परंपरेने जपलेल्या लोककला आणि सांस्कृतिक संचित आदींनी युक्त कोकणभूमीत, कोकणच्या सांस्कृतिक राजधानीत पर्यटन, लोककला, सांस्कृतिक आणि कोकणी खाद्य महोत्सव आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवांतर्गत ५ फेब्रुवारी २०२३ रोजी सकाळी शोभायात्रा निघणार असून यात कोकणातील लोककलाकार सहभागी होणार आहेत. सलग चार दिवस सायंकाळी पालघर ते सिंधुदूर्ग या कोकणातील जिल्ह्यातील लोककला महोत्सवात सादर होणार आहेत. या निमित्ताने पर्यटन आणि लोककला यांच्यावर जाणकार अभ्यासकांच्या उपस्थितीत चर्चासत्रांचे आयोजन करण्यात आले आहे. महोत्सवात पर्यटक आणि रसिकांसाठी मत्स्याहारापासून विविध प्रकारच्या खाद्य पदार्थांची पर्वणी असणार आहे.
लोककलांबद्दल सर्वांना जिव्हाळा आणि आदर आहे. कोकणातल्या लोककला, पर्यटन, कोकणी खाद्यसंस्कृती यांची ओळख सर्वदूर व्हावी यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. पर्यटन लोककला सांस्कृतिक कोकणी खाद्य महोत्सवाच्या मंडप उभारणीच्या शुभारंभप्रसंगी संदेश आयरे, अंकुश आवले, शुभम कदम, अमेय चितळे, ओंकार नलावडे, वाचनालयाचे अध्यक्ष डॉ. यतीन जाधव, उपाध्यक्ष सुनील खेडेकर, राष्ट्रपाल सावंत, कार्याध्यक्ष धनंजय चितळे, कार्यवाह विनायक ओक, ज्येष्ठ साहित्यिक प्रकाश देशपांडे, नामवंत कवी अरुण इंगवले, मंडप डेकोरेटर्स बाळा मोरे, समीर शेट्ये, प्रकाश घायाळकर, महंमद फकीर, सतिश कदम, धीरज वाटेकर, संध्या रानडे, विकी लवेकर आदी उपस्थित होते
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा