लोटे येथील अनधिकृत गोशाळेविरोधात सोनगाव ग्रामस्थ आक्रमक ; एमआयडीसी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला सुरवात

खेड प्रतिनिधी : खेड तालुक्यातील लोटे औद्योगिक वसाहतीच्या जागेवर असलेल्या अनधिकृत गोशाळेच्या विरोधात सोनगाव व परिसरातील नागरिकांनी आक्रमक भूमिका घेतली असून येथील ग्रामस्थांनी खेर्डी एमआयडीसी कार्याल्यासमोर आमरण उपोषणाला सुरवात केली आहे. जो पर्यंत या अनधिकृत गोशाळेवर कारवाई होत नाही तो पर्यंत आम्ही उपोषण मागे घेणार नाही असा इशारा आंदोलनकर्त्यांनी दिला असल्याने एमआयडीसी कार्यलयाच्या अधिकाऱ्यांसमोर चांगलाच पेच निर्माण झाला आहे. 

लोटे औद्योगीक क्षेत्र परीरातील एम आय डी सी च्या सुमारे चार एकर जागेवर ज्ञानेश्वर माउली मुक्तिधाम गोशाळा आहे. हभप भगवान कोकरे या गो शाळेचे संस्थापक संचालक आहेत. कोकरे महाराज यांनी एमआयडीसीच्या जागेवर उभारलेली ही गोशाळा सोनगाव ग्रामपंचायतीच्या हद्दीत असून ही गोशाळा उभारताना ग्रामपंचायतीची कोणतीही परवानगी घेतलेली नाही. या गोशाळेमध्ये असलेल्या गाई या दिवसरात्र परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतात घुसून शेतीचे नुकसान करत असतात किंवा या गाईंचा डेरा महामार्गावर असतो त्यामुळे महामार्गावर वारंवार अपघात देखील होत असतात. या गोशाळेच्या बाजूने सोनगाव येथे जाणारा एक नैसर्गिक ओढा असून या ओढ्यात गो शाळेचे शेण आणि गोमूत्र टाकले जात असल्याचा आरोप ग्रामस्थांचा आहे. 

ओढ्यात गाईंचे शेण आणि गोमूत्र सोडले जात असल्याने हा ओढा पूर्णपणे दूषित झाला असून परिणामी परिसरातील नैसर्गीक जलस्रोत देखील दूषित होऊ लागले आहेत. गतवर्षी सोनगाव येथील ग्रामस्थ जेव्हा ओढ्यावर गणपती विसर्जनासाठी गेले तेव्हा हा संपूर्ण ओढा दूषित असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले त्यामुळे ग्रामस्थांनी सुमारे चार ते पाच तास गणेशविसर्जन थांबवून एम आय डी सी याकडे प्रशासनाचे लक्ष वेधले होते. त्यावेळी एम आय डी सी च्या अधिकाऱ्यांनी संबंधित गोशाळेचे अतिक्रम हाटिवण्याची हमी दिल्यानंतर ग्रामस्थांनी गणेश विसर्जन केले होते. 

सोनगाव येथील ग्रामस्थांना एम आय डी सी च्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आश्वासनानुसार त्या गोशाळेवर कारवाई होणे गरजेचे होते मात्र अद्याप गो शाळेवर कोणतीच  कारवाई न झाल्याने आता सोनगाव येथील ग्रामस्थांचा संयम  संपला असून आता आर या पारची लढाई लादण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

आधीच दिलेल्या इशाऱ्यानुसार सोमवार दिनांक २३ जानेवारी रोजी सकाळपासून सोनगाव येथील ग्रामस्थांनी चिपळूण तालुक्यातील खेर्डी येथील एम आय डी सी च्या कार्यलासमोर उपोषण सुरु  केले. ग्रामस्थांचे उपोषण सुरु होतात एम आय डी सी च्या अधिकाऱ्यांनी आंदोलकांची भेट घेऊन चर्चा केली. मात्र सायंकाळपर्यंत योग्य तोडगा न निघाल्याने ग्रामस्थांचे उपोषण सुरूच राहिले. जो पर्यंत समाधानकारण तोडगा निघत नाही किंवा अनधिकृत गोशाळेवर हातोडा पडत नाही तो पर्यंत उपोषण मागे घेणार नाही असा पवित्रा  ग्रामस्थांनी घेतला असल्याने अधिकाऱ्यांसमोरपेच निर्माण झाला आहे. 

टिप्पण्या