कोकणातील चाकरमान्यांसाठी खुशखबर! ‘या’ मार्गावर दररोज धावणार मेमू ट्रेन

रायगड : प्रतिनिधी

कोकणातील चाकरमान्यांना आता थेट रोह्यापर्यंत मेमूने प्रवास करणे शक्य होणार आहे. सध्या मेमू सेवा दिवा-पेण या मार्गावर सुरू आहे. या मेमूचा रोह्यापर्यंत विस्तार करण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.

मेमू ट्रेन दिवा ते रोह्यापर्यंत सुरू होणार 

दिवा-पेण-दिवा गाडी क्रमांक (०१३५१/०१३५२) ही मेमूगाडी आता रोहा स्थानकापर्यंत धावणार आहे. या गाडीचा परतीचा प्रवास सुद्धा रोह्यातून सुरू होणार आहे. मंगळवार २२ नोव्हेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी सुरू झाली.

मेमू दिवा स्थानकातून सायंकाळी ६.४५ ला सुटेल आणि रोह्यात रात्री ९.२० ला पोहोचेल. परतीच्या प्रवासासाठी मेमूगाडी सकाळी ६.४० ला रोह्यातून निघेल आणि सकाळी ९.१० ला दिव्यात पोहोचेल.

रोहा, तळा, म्हसळा, मुरूड याठिकाणी ग्रामीण भागात राहणारे हजारो नागरिक मोठ्या संख्येने पनवेल, दिवा, मुंबई, ठाणे या ठिकाणी नोकरी व व्यवसायानिमित्त ये-जा करतात. रोह्यावरून पहाटे ५ नंतर मुंबई अथवा पनवेलला जाण्यासाठी दुसरी गाडी उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. याच पार्श्वभूमीवर मेमू ट्रेन रोह्यापर्यंत चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे

टिप्पण्या