पाणी टंचाईमुळे; दिव्यातील बेडेकर नगर मधील रहिवाश्यांचा निर्धार यंदाची दिवाळी साजरी करणार नाही - मनसेचा पालिकेला थेट इशारा
ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)
दिव्यातील बेडेकर नगर मधील बेडेकर शाळेजवळील काही चाळींना आणि इमारतींना गेले काही महिने हंडाभर पाण्यासाठी मोठा त्रास घ्यावा लागतोय, पालिकेकडून अंतर्गत सबलाईन टाकण्यात आल्यानंतर त्याला २ इंचाच्या ब्रँच काढून लोकांना पाण्याचे कनेक्शन देण्यात आले होते,पण काही ठिकाणी एका-एका ब्रँच वर २५-२५ टॅब लोकांना देण्यात आले ज्यामुळे पाणी कोणालाच योग्य प्रमाणात मिळत नाही. त्यामुळे सदर ठिकाणी नवीन ब्रँच टाकून दोन ठिकाणी समप्रमाणात टॅब ची विभागणी केल्यास सर्वाना योग्य प्रमाणात पाणी मिळेल असा पर्याय दिवा मनसे तर्फे संबंधित पाणी खात्याचे कार्यकारी अभियंता सुरेश वाघिरे यांना सुचवला होता असे दिवा मनसे तर्फे सांगण्यात आले. त्यासाठी दिवा मनसे तर्फे पत्रव्यवहार ही केले गेले, सोबतच परिसरातील नागरिकांनीही याबाबत वेळोवेळी महापालिकेच्या पाणी खात्याकडे पत्रव्यवहार केले आहेत. मात्र अधिकाऱ्यांकडून फक्त थातुरमातुर उत्तरं दिली जात असून, पाणी खात्याचे अधिकारी या विषयाला गांभीर्याने घेत नसल्याचा आरोप दिवा मनसेने केला आहे.
बेडेकर नगर परिसरात रस्ते नसल्याने कुठेही पाण्याचे टँकर येण्याची सोय उपलब्ध नसल्याने, इथले नागरिक पूर्णतः याच पाण्यावर अवलंबून आहेत. या सबलाईनच्या कामासाठी मनसेकडून गेले तीन महिने पाठपुरावा सुरू आहे,किंबहुना त्याचे श्रेय मिळू नये म्हणून जाणीवपूर्वक काम केले जात नसल्याची शंका मनसे पदाधिकाऱ्यांनी बोलून दाखवली. ठाणे महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाकडून हे काम दिवाळीपूर्वी न केले गेल्यास ठाणे महापालिकेच्या नावाने यावर्षीची दिवाळी बेडेकर नगर वासीय साजरे करणार नाहीत असे मनसेतर्फे सांगण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा