रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषद जिल्हाध्यक्ष पदी मुश्ताक खान तर सचिवपदी मुझम्मील काझी यांची निवड


 रत्नागिरी: प्रतिनिधी (योगेश मुळे)

मराठी पत्रकार परिषद या संघटनेची  जिल्हा डिजिटल मीडिया परिषद स्थापना प्रत्येक जिल्ह्यात सुरू आहे. रत्नागिरीमध्ये विश्वस्त एस.एम. देशमुख आणि विश्वस्त किरण नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदच्या रत्नागिरी जिल्हा अध्यक्ष मुश्ताक खान (माय कोकण),तर सचिव पदी मुझम्मील काझी(ग्रामीण वार्ता) यांची नुकतीच निवड करण्यात आली आहे. 

ही निवड झाल्यावर जिल्हाध्यक्ष मुश्ताक खान यांनी डिजिटल मीडियाच्या पत्रकारांना डिजिटल मीडिया सध्या झपाट्यानं वाढत जाणारं माध्यम आहे. देशभरातील जवळ जवळ सर्वच महत्वाच्या वृत्तपत्रांनी आपल्या डिजिटल आवृत्तीला सुरुवात केली आहे. त्याचबरोबर फेसबुक, इन्सटा,  युट्यूबवर देखील लोकप्रिय झाले आहेत. शहरी भागाबरोबरच आता त्याचा विस्तार ग्रामीण भागातही वेगानं होत आहे. जिल्हा पातळीपासून गाव पातळीवर आज डिजिटल माध्यमं पोहोचली आहेत आणि उत्तम काम करत आहेत.

सुरुवातीला थोडासा दुर्लक्षित असलेलं हे माध्यम आता मध्यवर्ती ठिकाणी पोहोचलं आहे. सर्वांनाच मदतीनं याला अधिक उंचीवर कसं नेता येईल, याची विश्वासहर्ता कशी वाढेल यासाठी प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर डिजिटल मध्यमात काम करणाऱ्यांना राज मान्यता मिळवून देण्यासाठी मी प्रामाणिकपणे प्रयत्न करणार आहे.

रत्नागिरी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यामध्ये लवकरच कार्यकारिणी तयार होण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करणार आहे. जिल्ह्यातील जास्तीत जास्त पत्रकार रत्नागिरी जिल्हा डिजिटल मीडिया परिषदेच्या माध्यमातून कशी जोडली जातील यासाठी मी आणि माझ्या सहकाऱ्यांच्या मदतीनं मी  प्रयत्न करणार आहे. 

लवकरच रत्नागिरी जिल्ह्याचा मी दौरा काढणार आहे. या दौऱ्याच्या दरम्यान डिजिटल मीडियामध्ये प्रभावीपणे काम करणाऱ्यांच्या गाठीभेटी घेऊन त्यांच्या अडचणी समजून घेणार आहे.  जास्त जास्त लोकं डिजिटल मीडियाशी कशी जोडली जातील यासाठीही जाणीवपूर्वक प्रयत्न करणार आहे. आणि मला डिजिटल मीडियामध्ये 11 वर्षांचा अनुभव आहे. बीबीसी मराठी (फ्रीलान्स), भारत4इंडिया, माय कोकण प्लॅटफॉर्मसाठी मी काम केलं आहे. जिल्ह्यातील माझ्या सहकारी मित्रांना माझ्या अनुभवाचा उपयोग करून देण्यास मी पुढाकार घेईन हा विश्वास देतो. तसेच माझ्यावर विश्वास दाखवून जिल्ह्याचे नेतृत्व करण्याची संधी दिल्याबद्द मी एस. एम. देशमुख सर, किरण नाईक सर आणि जिल्ह्यातील माझ्या सर्व सहकाऱ्यांचे आभार मानतो. अशी प्रतिक्रिया दिली आहे.

तर जिल्हा सचिव मुझम्मील काझी  प्रतिक्रिया देताना म्हणाले, समाजाचा डिजिटल मीडियाकडे पाहण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. हा दृष्टीकोन आपल्या कामातून बदलण्याची गरज आहे. जिल्हाभर डिजिटल मीडियाचे अनेक पत्रकार काम करत आहेत. त्यांना मराठी पत्रकार परिषदेच्या छताखाली आणून योग्य मार्गदर्शन केले जाणार आहे. त्यांचे विविध प्रश्न सोडविण्यासाठी शासन दरबारी मराठी पत्रकार परिषद प्रयत्नशील राहणार आहे. यासाठी मराठी पत्रकार परिषद संलग्न महाराष्ट्र डिजिटल मीडिया परिषदेची स्थापना करण्यात आलेली आहे. जिल्ह्यातील डिजिटल मीडियातील पत्रकारांना संघटित करून चांगले काम उभे करण्याची आशा देखील त्यांनी यावेळी व्यक्त केली.

यावेळी मराठी पत्रकार परिषद राज्य प्रतिनिधी जान्हवी पाटील, रत्नागिरी माजी जिल्हाध्यक्ष हेमंत वणजू, जिल्हा कार्याध्यक्ष राजेश शेळके, तालुकाध्यक्ष आनंद तापेकर, सचिव जमीर खलफे यांच्यासह सर्वांनी डिजिटल मीडिया परिषदच्या नवीन कार्यकरणीचे अभिनंदन केले आहे.

टिप्पण्या