उत्तर कोरियाने दक्षिण कोरियावर डागले क्षेपणास्र; १७० तोफागोळ्यांचा मारा, दोन्ही देशांमधील तणाव वाढला


 देश - विदेश 

समुद्राच्या पूर्व किनाऱ्यावर उत्तर कोरियाने क्षेपणास्र डागल्याचा आरोप दक्षिण कोरियाच्या लष्कराने केला आहे. या परिसरात उत्तर कोरियाने लढाऊ विमानं उडवल्याचा दावाही दक्षिण कोरियाने केला आहे. शुक्रवारी पहाटे १ वाजून ४९ मिनिटांनी उत्तर कोरियाच्या राजधानीतून क्षेपणास्र डागले, असे दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी एका निवेदनात म्हटले आहे.

सीमाभागातील पूर्व आणि पश्चिम किनारपट्टी भागातून तोफगोळ्यांच्या १७० मारा करण्यात आल्याचा दावा दक्षिण कोरियाच्या संयुक्त दलाच्या प्रमुखांनी केला आहे. २०१८ मध्ये उत्तर आणि दक्षिण कोरियामधील लष्करी कराराद्वारे तणाव निवळल्यानंतर स्थापन करण्यात आलेल्या सागरी बफर झोनमध्ये हे तोफगोळे पडल्याचे दक्षिण कोरियाने म्हटले आहे. हे दोन्ही देशांमधील लष्करी कराराचे उल्लंघन असल्याचे दक्षिण कोरियाचे संयुक्त दलाचे प्रमुख म्हणाले आहेत.

दरम्यान, ४ ऑक्टोबरला उत्तर कोरियाने मध्यम तीव्रतेचे बॅलिस्टिक क्षेपणास्र डागले होते. त्याआधी या देशाकडून लष्करी कवायती करण्यात आल्या होत्या. उत्तर कोरियाकडून सातत्याने क्षेपणास्र चाचण्या केला जात आहेत. त्यामुळे जगभरातील देशांची चिंता वाढली आहे. अलिकडेच उत्तर कोरियाने जपानवर क्षेपणास्र डागले होते. त्याच्या प्रत्युत्तरात अमेरिका, जपान आणि दक्षिण कोरियानेही क्षेपणास्राच्या चाचण्या केल्या आहेत. या देशांनी संयुक्त लष्करी सरावही केला आहे.

उत्तर कोरियाने जपानवरून डागलेल्या क्षेपणास्राचा भारताकडून निषेध नोंदवण्यात आला होता. यामुळे जपानसह लगतच्या परिसरातील शांती आणि सुरक्षितता धोक्यात आल्याचे भारताने म्हटले होते. या घटनेचा संयुक्त राष्ट्राच्या सुरक्षा परिषदेत भारतासह ११ देशांनी संयुक्त निवेदन जारी करत निषेध नोंदवला होता.

टिप्पण्या