ठाण्यात जन्म दाखल्यासाठी पैसे घेणे शिपायाला पडले महागात; आयुक्तांची थेट निलंबनाची कारवाई

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

महापालिकेच्या माजिवाडा-मानपाडा प्रभाग समितीअंतर्गत येणाऱ्या कावेसर येथील उपकार्यालयामध्ये मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी गेलेल्या महिलेकडे पैशांची मागणी करून तिच्याकडून एका शिपायाने पाचशे रुपये घेतले. परंतु महिलेने घडलेल्या प्रकाराबाबत समाजमाध्यांवर संताप व्यक्त करताच महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी त्याची दखल घेऊन त्या शिपायाला निलंबित केले. तसेच उपकार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक अशा दोन अधिकाऱ्यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. त्यामुळे जन्म दाखला देण्यासाठी मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये पैशांची मागणी करून पाचशे रुपये घेणे त्या शिपायाला चांगलेच महागात पडल्याचे चित्र आहे.

ठाणे येथील घोडबंदर भागात तक्रारदार महिला राहते. तिचे पती मुलीचा जन्म दाखला घेण्यासाठी कावेसर येथील उपकार्यालयामध्ये गेले होते. तिच्या पतीने जन्म दाखल्याच्या दहा प्रति देण्याची मागणी करून त्याप्रमाणे शुल्काचा भारणा केला. या कार्यालयामध्ये जन्म दाखला देण्याच्या कामाची जबाबदारी एका शिपायावर सोपविण्यात आली असून त्याने जन्म दाखल्याच्या प्रती देण्यासाठी त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. त्यावर त्यांनी पैसे कशासाठी द्यायचे अशी विचारणा करताच, मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये पैसे देण्यास सांगितले. अखेर त्याने त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतले. या छळाबाबत पतीने माहिती दिल्यानंतर त्या महिलेने समाजमाध्यांवर याबाबत संदेश प्रसारित करून संताप व्यक्त केला. त्याची महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी गंभीर दखल घेऊन उपायुक्तांना याप्रकरणी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर पालिकेच्या अधिकाऱ्यांनी समाजमाध्यमांवर संदेश पाठवून त्या महिलेची संपर्क साधला आणि तिच्या घरी जाऊन संपुर्ण प्रकरणाची माहिती घेतली. त्यात जन्म दाखला देण्यासाठी मुलगी झाल्याच्या खुशीमध्ये एका शिपायाने पैशांची मागणी करून त्यांच्याकडून पाचशे रुपये घेतल्याची बाब समोर आली.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी या शिपायाचा शोध घेऊन त्याला निलंबित केले तर, उपकार्यालयीन अधीक्षक आणि लिपिक अशा दोन अधिकाऱ्यांना याप्रकरणी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे, अशी माहिती पालिका सूत्रांनी दिली. नागरिकांना सेवा पुरविणे हे महापालिकेचे कर्तव्य असून त्याचबरोबर सेवा घेतल्यानंतर नागरिकांना त्याचा सुखद अनुभव यायला हवा. त्यामुळे असे प्रकार समोर आले तर, संबंधितांवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा आयुक्त बांगर यांनी सर्वच अधिकारी-कर्मचाऱ्यांना दिल्याचेही सूत्रांनी सांगितले

टिप्पण्या