महावितरणच्या भोंगळ कारभाराबाबत संगमेश्वर भाजपने घेतली उपकार्यकारी अभियंत्यांची भेट.


 संगमेश्वर: प्रतिनिधी (योगेश)

कडवई आणि परिसरातील गावांमध्ये मागील अनेक महिन्यांपासून विजेचा लपंडाव सुरू आहे. वादळ, पाऊस असो वा नसो एकही दिवस वीज पुरवठा सुरळीतपणे होत नाही. अनेकवेळा ऐन कामकाजाच्या वेळी वीजपुरवठा खंडित होतो. यामुळे परिसरातील व्यापारी वर्ग त्रस्त झाला असून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान सहन करत आहे.

याबाबतीत स्थानिक व्यापाऱ्यांनी कार्यालयात वेळोवेळी तक्रारी करूनदेखील परिस्थिती जैसे थे असल्याने भाजपा संगमेश्वर सरचिटणीस डॉ.अमित ताठरे, जिल्हा उपाध्यक्ष हरीभाई पटेल, भारतीय जनता युवामोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश गुरव, तालुका उपाध्यक्ष मिथून निकम, गणेश पवार आदी पदाधिकारी व कार्यकर्ते महाराष्ट्र वीज वितरण कंपनी संगमेश्वरचे उपकार्यकारी अभियंता श्री. मोगल यांच्या भेटीसाठी कार्यालयात गेले व आवश्यक पावले उचलून तातडीने वीजपुरवठा सुरळीत करावा असे निवेदन दिले.

 कडवई परिसरासाठी केवळ आरवली फिडर वरून वीजपुरवठा जोडलेला आहे. त्यासोबत संगमेश्वर फिडरवरून देखील विजेची जोडणी तातडीने करून वीज पुरवठ्यात नियमितता आणून नागरिकांना दिलासा द्यावा याबाबत निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली आहे.

तसेच करजुवे परीसरात अनेक ठिकाणी गंजलेल्या अवस्थेतील पोल लवकरच बदलून मिळावेत या आशयाची वेगळी मागणीदेखील केली आहे. या सर्व समस्या अत्यंत गांभीर्याने हाताळल्या जातील व त्यावर तातडीने उपाययोजना करून लोकांच्या अडचणी दूर करू असे आश्वासन उपकार्यकारी अभियंता श्री. मोगल यांनी दिले.

टिप्पण्या