उध्दव ठाकरें कडुन राजन साळवींचे तोंडभरुन कौतुक
रत्नागिरी : प्रतिनिधी ( योगेश मुळे )
रत्नागिरी-राजापूर तालुक्यात ठाकरे गटाला यश आले आहे. याठिकाणी ठाकरे गटाचे आमदार राजन साळवी यांचे वर्चस्व कायम असल्याचे दिसून आले. या पार्श्वभूमीवर गद्दारांच्या छाताडावर उभं राहून निवडणुका लढल्या, अशा शब्दात उद्धव ठाकरेंकडून राजन साळवींचं कौतुक करण्यात आले.
रत्नागिरी-राजापूर तालुक्यातील राजन साळवी यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना जोरदार धक्का दिला आहे. आंगले, सौंदळ, राजवाडीमध्ये उद्धव ठाकरे शिवसेना पुरस्कृत पॅनल विजयी झाले आहेत. दक्षिण रत्नागिरीत १८ जागांवर उद्धव ठाकरे गटाचा दबदबा दिसला. यानंतर सोमवारी राजन साळवी यांना उद्धव ठाकरे यांचा फोन करुन मातोश्रीवर येण्याचं निमंत्रण दिलं होतं. यानुसार राजन साळवींनी उध्दव ठाकरेंची भेट घेतली. यावेळी उध्दव ठाकरेंनी राजन साळवींचे तोंडभरुन कौतुक केले.
माझ्या बाजूला राजन साळवी उभे आहेत. त्यांना अनेक गद्दारांनी आमिष दाखवली. पण, ते हलले नाहीत. तर, त्यांना गाडून त्यांच्या छाताडावर उभे राहून ग्रामपंचायती निवडून आणल्या आहेत, असे कौतुक उध्दव ठाकरेंनी राजन साळवींचे केले. यावेळी बुलढाण्याचे देखील कार्यकर्ते उद्धव ठाकरेंच्या भेटीला आले होते.दरम्यान, राजन साळवी यांची सोमवारी अचानक सुरक्षा काढण्यात आली आहे. यानंतरही माझी निष्ठा कायमस्वरूपी बाळासाहेब ठाकरे यांच्या चरणाशीच आहे. मी मरेपर्यंत शिवसैनिक म्हणूनच आहे. कुठंही जाणार नाही, असं राजन साळवी म्हणाले होते. ठाकरे गट अस्थिर असताना राजन साळवी यांनी कायम शिवसैनिक म्हणून राहणार असल्याचा शब्द उद्धव ठाकरे यांना दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा