'कार्यशैली बदला, शहर स्वच्छ ठेवा, अन्यथा कारवाईला सामोरे जा'- अतिरिक्त आयुक्त संजय हेरवाडे

ठाणे : प्रतिनिधी (निलेश घाग)

शहरातील स्वच्छतेचा दर्जा वाढविण्यासाठी आपल्या कामाची शैली या क्षणापासून बदलायला पाहिजे. सर्व स्वच्छता कर्मचारी कार्य क्षेत्रात वेळेवर हजर झाले पाहिजेत. स्वच्छतेची कामे झालेली दिसली पाहिजेत. तोंडदेखली, कागदपत्रे नाचवणारी कामे खपवून घेतली जाणार नाहीत, असा कडक इशारा अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांनी स्वच्छता निरीक्षकांना दिला.

 ठाणे महानगरपालिकेचे सर्व मुख्य स्वच्छता निरीक्षक, उप स्वच्छता निरीक्षक आणि स्वच्छता निरिक्षकांची बैठक मुख्यालयातील कै. नरेंद्र बल्लाळ सभागृहात झाली. या बैठकीत, अतिरिक्त आयुक्त (२) संजय हेरवाडे यांच्यासह उपायुक्त मनीष जोशी आणि मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी हळदेकर यांनी मार्गदर्शन केले.

 मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांनी यापूर्वीच आपल्याला स्वच्छतेविषयीच्या अपेक्षा सांगितल्या आहेत. एखाद्या वाहून घेतलेल्या अधिकारी- कार्यकर्त्याप्रमाणे कार्यक्षेत्रात उतरून काम करण्याची वेळ आली आहे. हे जमणार नसेल, तर महापालिकेतील त्या स्वच्छता निरीक्षकाला कडक कारवाईला सामोरे जावे लागेल, अशी ताकीदही हेरवाडे यांनी दिली.

शहराची ओळख स्वच्छतेतून होते. ठाणे शहर कचरामुक्त करणे व शहराचे सौंदर्य वाढावे व अबाधित ठेवणे हे मा. मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथ शिंदे यांचे स्वप्न आहे. आपल्या घरातील व्यक्ती वापरू शकेल, इतकी सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता हवी. त्यासाठी कार्यक्षेत्रात पूर्णवेळ उभे राहून काम करून घ्या. स्मार्ट वॉचच्या माध्यमातून सर्व कर्मचाऱ्यांच्या कामावरच्या वेळा, जागा हे सगळे कळणार आहे, याची जाणीवही संजय हेरवाडे यांनी करून दिली.

 कर्मचाऱ्यांची पूर्णवेळ उपस्थिती दिलेल्या हद्दीप्रमाणे तेथील सर्व स्वच्छता विषयक कामे दररोज दर्जेदार झाली पाहिजेत. त्यावर मुख्य, उप आणि स्वच्छता निरिक्षकांनी प्रत्यक्ष जागेवर जाऊन पर्यवेक्षण करणे. कामात काही त्रुटी असतील तर त्या तत्काळ पूर्ण करून घेणे ही जबाबदारी काळजीपूर्वक पार पाडावी, अशी अपेक्षा संजय हेरवाडे यांनी व्यक्त केली.

 प्लास्टिक बंदी, घातक कचरा उत्पादन, सांडपाण्यावर शेती करणे, कचरा पेटविणे यावर डोळ्यात तेल घालून कारवाई केली पाहिजे. रात्रीच्या वेळी रस्ते झाडण्याचे काम थांबणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच, वारंवार अनुपस्थित राहणारे, व्यसनी, कामचुकार कर्मचारी यांच्यावर तातडीने कारवाईचा प्रस्ताव सादर करण्याचे निर्देश संजय हेरवाडे यांनी या बैठकीत दिले.

                                                                                                                                                                                                         दक्षता पथकांची निर्मिती


        स. ६ ते दु. २ आणि दुपारी ३ ते रात्री ११ या काळात दक्षता पथके सर्वत्र फिरणार आहेत. हजेरी पेटीवरील कामगारांची हजेरी, स्वच्छता निरिक्षक यांची उपस्थिती, सफाईच्या कामांचा दर्जा, कचरा संकलन वाहनांच्या फेऱ्या हे सगळे तपासले जाणार असल्याचे उपायुक्त मनीष जोशी यांनी स्पष्ट केले.

टिप्पण्या