सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी Live पाहता येणार; तुमच्या मोबाईलवर दिसणार सत्तासंघर्षाचा युक्तीवाद


मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)

 Supreme Court constitutional bench hearing to be live streamed सर्वोच्च न्यायालयामध्ये घटनापीठापुढे होणाऱ्या सुनावण्याचं थेट प्रक्षेपण आजपासून म्हणजेच २७ सप्टेंबरपासून केलं जाणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने यासंदर्भात एका महिन्यापूर्वी नोटीस जारी करुन न्यायालयाच्या कामकाजासंदर्भातील खंडपीठाला याबद्दलचे निर्देश दिले होते. त्यानुसार आजपासून घटनापीठापुढील सुनावणीचं थेट प्रक्षेपण केलं जाणार आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील शिंदे विरुद्ध ठाकरे हा सत्तासंघर्ष, आमदार अपात्रता आणि खरी शिवसेना कोणाची, या मुद्द्यांवरील सुनावणीपासून या थेट प्रक्षेपणाला सुरुवात होणार आहे.

सर्वोच्च न्यायालयातील हे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय माहिती केंद्र म्हणजेच नॅशनल इनफॉर्मेटीक्स सेंटरच्या (एनआयसीच्या) माध्यमातून वेबकास्ट केलं जाणार आहे. ही सुनावणी सर्वोच्च न्यायालयाच्या प्लॅटफॉर्मवर म्हणजेच वेबकास्ट डॉट जीओव्ही डॉट इन (webcast.gov.in) वर दिसणार आहे.

सरन्यायाधीश उदय लळीत यांनी लवकरच सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणी या न्यायालयाच्या स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन थेट प्रक्षेपित केल्या जातील अशी माहिती दिली. युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण करण्याऐवजी न्यायालय स्वत:च्या प्लॅटफॉर्मवरुन ही सेवा उपलब्ध करुन देईल, असा विश्वास सरन्यायाधिशांनी व्यक्त केला. सध्या सर्वोच्च न्यायालयाकडून युट्यूबवरुन थेट प्रक्षेपण केलं जातं आणि नंतर ते स्वत:च्या सर्व्हरवरुन दाखवलं जातं, अशी माहिती सूत्रांनी दिली. लोकांना त्यांच्या लॅपटॉप, मोबाईल फोन्स आणि कंप्युटरवर कोणत्याही अडथळ्याशिवाय थेट प्रक्षेपण पाहता येणार आहे.






टिप्पण्या