निवडणूक आयोगाच्या लढाई आधीच ठाकरे गटाने टाकला धनुष्यबाण?
मुंबई : प्रतिनिधी (प्रणिल पडवळ)
शिवसेना कुणाची? तसंच शिवसेनेचं धनुष्यबाण हे चिन्ह कुणाला मिळणार याचा फैसला आता निवडणूक आयोगापुढे होणार आहे. सुप्रीम कोर्टाच्या घटनापीठापुढे झालेल्या सुनावणीमध्ये हा निर्णय देण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाबाबतचा निकाल येत नाही, तोपर्यंत निवडणूक आयोगाच्या कारवाईवर स्थगिती देण्यात यावी, अशी मागणी ठाकरे गटाकडून न्यायालयात करण्यात आली, पण न्यायालयाने ही मागणी फेटाळून लावली.
सुप्रीम कोर्टाच्या या निकालानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया देण्यात येत आहेत, यातली शिवसेना प्रवक्त्या मनिषा कायंदे यांची प्रतिक्रिया अत्यंत बोलकी आहे. निवडणूक आयोग केंद्र सरकारच्या अखत्यारित येतं, त्यामुळे पुढे काय होऊ शकतं, याचा अंदाज लावणं फार काही कठीण नाही, असं मनिषा कायंदे एबीपी माझा या वृत्तवाहिनीशी बोलताना म्हणाल्या. मनिषा कायंदे यांच्या या वक्तव्यामुळे ठाकरे गटाने निवडणूक आयोगाच्या लढाईआधीच धनुष्यबाण टाकून दिला का? असा प्रश्न उपस्थित होत आहे.
'तरीपण आम्ही ही लढाई लढतो आहोत. आम्ही आमची बाजू आयोगापुढेही मांडू. आयोग आमचं म्हणणं नक्कीच ऐकेल, अशी आशा आम्हाला आहे', असंही मनिषा कायंदे म्हणाल्या आहेत.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा