घाटकोपर मानखुर्द उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल असे नाव सुचविले असताना दुसर्‍या नावाचा अट्टाहास कशासाठी ? - खासदार मनोज कोटक

 


मुंबई(शांत्ताराम गुडेकर )

          खासदार मनोज कोटक  यांच्या लोकसभा मतदार संघातील घाटकोपर- मानखुर्द लिंक रोडवरील पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होणाऱ्या मोठ्या उड्डाणपूलाचे नामकरण "छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल" असे करण्याची खासदार मनोज कोटक यांनी  महापालिकेतील स्थापत्य समिती उपनगरे अध्यक्ष यांजकडे लेखी पत्राद्वारे दि.०९ डिसेंबर २०२० रोजी मागणी केली असताना आता अचानक शेजारील  लोकसभा मतदारसंघाचे शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे यांनी या उड्डाणपुलाला 'सुफी संत सुल्तानुल हिंद ख्वाजा गरीब नवाज मोहिनुद्दीन सुफी चिश्ती- अजमेरी' यांचे नाव देण्याची  मागणी लेखी पत्राद्वारे मा.मुख्यमंत्री महाराष्ट्र यांजकडे दि.१० जून २०२१ रोजी केली आहे. 

            घाटकोपर- मानखुर्द लिंक रोड जोड मार्गावरील शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलाचे काम आता अखेरच्या टप्प्यात आहे. हा उड्डाणपूल सुप्रसिद्ध शिवाजीनगर भागावरून जातो. या उड्डाणपुलामुळे शिवाजीनगर परिसरातील व चौकातील रहदारी मोठ्या प्रमाणावर कमी होणार आहे. ही बाब लक्षात घेता शिवाजीनगर आंतरछेदावरील उड्डाणपुलास म्हणजेच पूर्व मुक्त मार्गाजवळून सुरु होऊन शिवाजीनगर आंतरछेदावरून पुढे जाणाऱ्या घाटकोपर - मानखुर्द जोडमार्गावरील  पुलाचे 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नामकरण करण्यात यावे अशी मागणी सर्वसामान्य जनतेतून होत आहे.  या पार्श्वभूमीवर सदर उड्डाणपुलाला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव देण्याची मागणी खासदार मनोज कोटक यांनी अध्यक्ष, स्थापत्य समिती उपनगरे यांच्याकडेही लेखी पत्राद्वारे गतवर्षीच केली आहे.

सात महिने पूर्वीपासूनच या उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज उड्डाणपूल' असे नाव देण्याची मागणी केली असताना केवळ पुष्टिकरणाच्या राजकारणासाठी वेगळे नाव सुचविले काय? अशी शंका व्यक्त करण्यात येत आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावावर ज्यांनी तहहयात राजकारण केले त्या शिवसेनेला हिंदुत्वाप्रमाणे  आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचे वावडे आहे काय असाही सवाल खासदार कोटक यांनी विचारला.

               मुस्लिम संतांचे नाव स्थानिक जनतेच्या सहमतीने  इतर कोणत्याही विकास कामास  देण्याला भारतीय जनता पक्षाचा विरोध नाही असे प्रतिपादन खासदार मनोज कोटक यांनी केले.उड्डाणपूल नामकरणाबाबत चूकिचे राजकारण केले जात असल्याची टीका खासदार मनोज कोटक यांनी केली आहे.उड्डाणपूल महापालिकेचा मग नामकरणाबाबत पत्र महापालिकेला न देता थेट मुख्यमंत्र्यांना का?केवळ मतांच्या राजकारणासाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचा वापर करणाऱ्या शिवसेनेला महापालिका सभागृहात तर चोख उत्तर देऊच पण  जोपर्यंत सदर उड्डाणपुलाला 'छत्रपती शिवाजी महाराज' यांचे नाव दिले जात नाही तोपर्यंत भारतीय जनता पक्ष सभागृहात स्वस्थ बसणार नाही आणी रस्त्यावर उतरून तीव्र संघर्ष करेल असा इशारा स्थायी समिती सदस्य नगरसेवक भालचंद्र शिरसाट यांनी दिला आहे.

टिप्पण्या