कोरोनामुळे निराधार झालेल्या विद्यार्थांना जावडे हायस्कूलमधून मोफत शिक्षण,राहण्या-खाण्याची सोय उपलब्ध होणार
लांजा : हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल,जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा जावडे ता.लांजा या शाळांमध्ये समाजातील गोरगरीब तसेच कोरोना सारख्या भयंकर आजारामध्ये निराधार झालेल्या सर्व जातीधर्मातील विद्यार्थ्यांना इयत्ता १ ली ते १० वी पर्यंतचे निवास व्यवस्थेसह मोफत शिक्षण देण्याचा निर्णय संस्थेने घेतला असल्याची माहिती संस्थेच्या अध्यक्षा श्रीम.अपर्णा पवार यांनी दिली.
हेरीटेज कल्चर आर्ट अँड एज्युकेशन डेव्हलपमेंट सोसायटी च्या वतीने लांजा तालुक्यातील जावडे येथे ३ एकर च्या निसर्गरम्य परिसरात अत्याधुनिक व्यवस्थेने सुसज्ज इमारतीसह शासन मान्यतेने न्यू इंग्लिश स्कूल,जावडे तसेच प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा या तीन शाळा चालविण्यात येतात. या शाळांमध्ये दर्जेदार व गुणवत्तापूर्ण शिक्षणाबरोबरच विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती व स्पर्धा परीक्षा तसेच मैदानी खेळ यांचे मार्गदर्शन व विविध प्रशिक्षणे दिली जातात यामुळेच राज्यभरातील विद्यार्थी या प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत प्रवेश घेत आहेत. विद्यार्थ्यांच्या निवास व भोजन व्यवस्थेसाठी संस्थेच्या वतीने आवश्यक त्या अत्याधुनिक सोयीसुविधांसह मुला-मुलींसाठी स्वतंत्र वसतिगृह इमारत उपलब्ध आहे.सध्या कोरोना सारख्या आजाराने थैमान घातले असून त्यामुळे अनेक कुटंबे निराधार झाली आहेत अशा परिस्थितीत समाजातील सर्व जाती धर्मातील विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नयेत या साठी संस्थेने १ ली ते १० वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना सर्व सोयींयुक्त असे मोफत शिक्षण देण्याचा निर्णय घेतला असून असे विद्यार्थी, पालक, नातेवाईक अथवा सामाजिक कार्यकर्ते यांनी संस्थेशी संपर्क साधण्याचे अवाहन संस्थापक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष कांबळे यांनी केले आहे. शाळा व वसतिगृह प्रवेशासंदर्भात अधिक माहिती साठी मुख्याध्यापक संदेश कांबळे ९२७०५३४३४० व गजानन पांचाळ ८१४९८१२१३२ यांचेशी संपर्क साधण्याचे अवाहन करण्यात आले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा