लांजा-राजापूरातील ढासळलेल्या आरोग्ययंत्रणेमुळे आता लोकांचे मनोधैर्य वाढविणे हाच एकमात्र उपाय – श्री विनोद चव्हाण

 


रत्नागिरी - कोरोनाचे संकट आणि त्यातच लांजा-राजापूरमधील ढासळली आरोग्य व्यवस्थेमुळे अनेकांना यावेळी आपल्या जीवाला मुकावे लागत आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा प्रभाव थेट ग्रामीण भागाला चटका देणारा आहे. वाड्या-वाड्यांमधून, गावा-गावांमधून कोरोना रुग्णांचे प्रमाण आणि  आरोग्य केंद्रामधील निदानांमधील तफावत लोकांमध्ये संभ्रम निर्माण करीत आहे. तसेच मृत्यूंचा आकडा हेच लोकांच्या भीतीचे कारण बनत आहे. कोरोनाने कमी परंतू प्रशिक्षणांच्या आणि विश्वासाच्या अभावामुळे भीतीनेच लोकांचा मृत्यू होत असल्याचे निदर्शनात येत आहे.  तरी आजच्या परिस्थितीला मल्टीस्पेशालिटी रुग्णालयापेक्षा आता विश्वासाचे आणि धीर देणारे शब्दच तारणारे असल्याचे मुचकुंदी परिसर विकास संघाचे सल्लागार श्री विनोद चव्हाण यांनी म्हटले आहे.

   अपुऱ्या आरोग्य व्यवस्थेमुळे सामान्य जनतेची फरफट होत असताना यासर्वावर सुनियोजन करण्यास गतीने पावले उचलणे गरजेचे आहेत. शिवाय तालुक्यातील व जिल्ह्यातील वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य ती खबरदारी घेणे देखील महत्वाचे आहे.  एकीकडे विषाणू बाधित क्षेत्र घोषित होत असताना मात्र त्यावरील प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात नाही. त्यातून खूप मोठा अनर्थ घडू शकतो. हे देखील टाळणे आवश्यक आहे. या साठी घराघरात पोहचण्याची क्षमता असलेल्या आशा वर्कस यांना प्रशिक्षणदेणून वाडी वस्तीवर ग्रामस्थांचे मनोधैर्य वाढविण्याची गरज आज समाजाला आहे.

   कोरोनाबाधित वा संभाव्य कोरोना नसलेल्या रुग्णांवरील रुग्णालयीन उपचार दोन विशिष्ट विलगीकरणांमध्ये होणे अपेक्षित आहे. मात्र त्यांना एकत्रच उपचार चालू असल्याचे प्रकार निदर्शनात आले आहेत. यामुळे ज्यांना कोरोना झालेला नाही त्यांच्या आणि नातेवाईकांच्या मनात भीतीचे वातावरण आहे. गावा-गावात डॉक्टरांनी फिरणे अपेक्षित असताना मात्र ते होताना दिसत नाही. मनुष्यबळाचा अभाव असल्याचे कारण देणे हे आजच्या परिस्थितीला शोभिवंत नाहीय. टाळेबंदीमुळे  दळणवळणाची साधने ठप्प, स्थानिक आणि खाजगी वाहनांवर देखील बंदी असल्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. जिल्हयात तसेच तालुक्यात ऑक्सिजनयुक्त आय.सी.यु. बेडची कमतरता असल्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीवर उपचार होण्यास विलंब होत आहे.

   दरम्यान, रत्नागिरी गेलेला माणूस पुन्हा घरी परतेल ही शाश्वती दिली जात नाहीय. कोरोनावर मात करण्यास जिल्हा प्रशासन देखील कमी पडत असून आपण लांजा राजापूर मध्ये उपजिल्हा रुग्णालय स्वरूपाचे आरोग्य व्यवस्थापण करावे  तसेच त्यामध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे मनोधैर्य वाढविण्यासाठी स्वतंत्र कक्ष उभारण्यात यावा अशी मागणी मुचकुंदी परिसर विकास संघ कडून करण्यात येत आहे. त्याचबरोबर रुग्णासोबत आलेल्या नातेवाईकांच्या खाण्या-पिण्याचे हाल होताना देखील निदर्शनास आले आहे.

   सदर परिस्थिती पाहता, जनतेचे सेवक आणि स्थानिक लोकप्रतिनिधी म्हणून आपण आपले दायित्व स्वीकारून सर्वांना विश्वात देणे अपेक्षित आहे. जनतेपर्यंत पोहचून त्यांना या संकटात लढायला धीर देणे तसेच त्यांच्या सहकार्यासाठी खंबीरपणे पाठीशी उभे राहणे महत्वाचे आहे. तरी वरील निदर्शनास आलेल्या बाबींचा विचार करून गाव कृतीदल यांच्या मदतीने  आपण जनतेशी संवाद साधावा त्याचबरोबर तातडीने सुनियोजन आणि व्यवस्थापनेकरिता अंमलबाजावणी करावी अशी आम्ही सामाजिक संस्था आपणास विनंती करीत आहोत.

टिप्पण्या