काँग्रेस नेते एकनाथ गायकवाड यांचे कोरोनामुळे निधन

 


मुंबई - ज्येष्ठ काँग्रेस नेते आणि माजी खासदार एकनाथ गायकवाड यांना काही दिवसांपूर्वी कोरोना विषाणूचा संसर्ग झाला होता. त्यामुळे त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. आज सकाळी दहा वाजताच्या सुमारास कोरोना त्यांचे निधन झाले. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांचे ते वडील होते. एकनाथ गायकवाड यांच्यावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होणार आहेत. 

 त्यांचा जन्म 1 जानेवारी 1940 साली सातारा जिल्ह्यात झाला होता. त्यांच्या पश्चात दोन मुली व दोन मुले आहेत. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड या एकनाथ गायकवाड यांच्या कन्या आहेत.

एकनाथ गायकवाड यांनी दक्षिण मध्य मुंबई मतदारसंघातून शिवसेना नेते आणि लोकसभेचे माजी सभापती मनोहर जोशी यांचा पराभव केला होता. जोशींचा पराभव करून ते जायंट किलर ठरले होते. त्यानंतर दोनवेळा ते दक्षिण मध्य मुंबईतून विजयी झाले होते. मात्र, २०१४च्या मोदी लाटेनंतर शिवसेनेचे नेते राहूल शेवाळे यांनी गायकवाड यांचा पराभव केला होता.

 एकनाथ गायकवाड यांनी राज्य मंत्रिमंडळात मंत्रिपद भूषविले आहे. काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते म्हणून त्यांची ओळख होती. काँग्रेसचे मुंबईचे माजी अध्यक्ष म्हणून देखील त्यांनी काम पाहिले आहे. गायकवाड हे काँग्रेसमधील असले तरी दलित चळवळीशी त्यांचे सख्य होते. दलित चळवळीतील कार्यकर्तेही त्यांना मानत होते. सर्वच रिपब्लिकन नेत्यांशी त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. सर्वांना सोबत घेऊन जाण्याची त्यांची वृत्ती होती. साधी राहणीमान असलेले गायकवाड विक्रोळीत राहत होते. मात्र, त्यांनी धारावीवर आपली पकड ठेवली होती. धारावीतील प्रत्येक चाळीतील लोकांना ते नावाने ओळखत होते. सामाजिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमात ते हिरहिरीने भाग घेत असायचे.

टिप्पण्या