कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 'होळी उत्सव' साध्या पद्धतीने साजरा करण्याचे महापौर व आयुक्तांचे आवाहन

 

ठाणे : महाराष्ट्रात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येणारा 'होळी उत्सव' यंदा कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता अत्यंत साधा पद्धतीने साजरा करून राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी केले आहे.

कोविड- १९ च्या अनुषंगाने यावर्षी सर्व धर्मीय सण, उत्सव तसेच सर्व कार्यक्रम अतिशय साधेपणाने साजरे करण्यात येत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव अद्यापही कमी झालेला नसून सध्या राज्यात तसेच मोठ्या शहरांमध्ये रूग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत आहे. त्यामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा विचार करता या वर्षी दिनांक 29 मार्च 2021 रोजी चा 'होळी उत्सव' अत्यंत साधेपणाने साजरा करण्याचे आवाहन महापालिकेने केले आहे.
     
 यासाठी शासनाच्यावतीने मार्गदर्शन सुचना देखील जाहीर करण्यात आल्या आहेत. यामध्ये होळीचा सण साजरा करताना मोठया प्रमाणात जागोजागी होळी पेटवण्यात येत असते. लाकडे जाळणे तसेच यामुळे होणारे वायु प्रदुषणाचा विचार करता होळी पेटवण्यात येऊ नये. धुलीवंदनाच्या दिवशी मोठया प्रमाणावर रंगाचा वापर करण्यात येतो त्यामुळे होणारा पाण्याचा अपव्यय टाळण्यात यावा. सार्वजनिक ठिकाणी अगर रस्त्यावर मोठया संख्येने एकत्र येणे अथवा गर्दी करणे टाळावे. कोणत्याही प्रकारे गर्दी आकर्षित होणार नाही अशा धार्मिक / सांस्कृतिक कार्यक्रमाचे अथवा मिरवणूकांचे आयोजन करण्यात येऊ नये तसेच “ माझे कुटूंब , माझी जबाबदारी " या मोहिमेअंतर्गत व्यैयक्तिकरित्या सुद्धा हा उत्सव करणे टाळण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
   
   शासनाच्या आदेशाची अंमलबजावणी करण्यास कोणत्याही व्यक्तीने टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांचे विरुध्द यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन अधिनियम , २००५ मधील कलम ५१ ते ६० , साथरोग नियंत्रण अधिनियम , १८ ९ ७ व भारतीय दंड संहिता , १८६० मधील कलम १८८ नुसार दंडनीय / कायदेशिर कारवाई करण्यात येणार आहे.

टिप्पण्या