बाल विकास विद्या मंदिर, जोगेश्वरी येथे "आदर्श माता" सन्मान सोहळा संपन्न
मुंबई(शांत्ताराम गुडेकर/ सौ.मणस्वी मणवे)
रत्नागिरी जिल्हा मराठा ज्ञाती समाज, मुंबई. संचालित बाल विकास विद्या मंदिर जोगेश्वरी (पूर्व) येथे नुकताच "आदर्श माता सन्मान " सोहळा संपन्न झाला. आंतरराष्ट्रीय जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून बाल विकास विद्या मंदिर शाळेच्या माध्यमिक विभागात विविध उपक्रम राबविण्यात आले होते. या शाळेमध्ये पूर्व प्राथमिक ते इयत्ता १० वी पर्यंत १२३९ विद्यार्थी ज्ञानार्जन करीत आहे. त्यापैकी इयत्ता ५ वी ते १० पर्यंत शिकत असलेल्या ८५७ विद्यार्थ्यांच्या महिला पालकांमधून एकूण ३० महिला पालकांना व सेविका श्रीमती सोनाली कांबळे यांना शाळेच्या सभागृहात आदर्श माता हे सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन गौरविण्यात आले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे शाळेचे माजी विद्यार्थी व आपलं महानगर वृत्तपत्रकाचे संपादक माननीय श्री.संजय सावंत उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थेचे उपकार्याध्याक्ष आणि आरजेएमडीएस इंग्लिश स्कूल चे अध्यक्ष माननीय श्री.सहदेव सावंत, संस्थेचे सरचिटणीस माननीय श्री. विश्वनाथ सावंत हे मान्यवर व शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. सुशिला पाटील उपस्थित होत्या. प्रमुख पाहुणे श्री.संजय सावंत, सरचिटणीस श्री.विश्वनाथ सावंत व समारंभाचे अध्यक्ष श्री. सहदेव सावंत यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. सौ.स्मिता रावराणे व श्री.जगदीश सुर्यवंशी यांनी समारंभाचे सूत्रसंचालन केले. आणि पर्यवेक्षक श्री.सिध्दार्थ इंगळे यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता केली. या कार्यक्रमात अधिवेशन प्रमुख आणि सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी, संगणक शिक्षक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा