ठाणेकर शिक्षिकेचा मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गौरव, राष्ट्रवादी काँग्रेसने केला सत्कार

ठाणे (प्रतिनिधी)- शिक्षण व्यवस्थेत आमूलाग्र बदल घडविण्यासाठी नवनवीन संकल्पना मांडणार्‍या शिक्षकांचा केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून गौरव करण्यात येत असतो. कोणत्याही प्रकारचे आर्थिक गणित न जुळवता शिक्षणासाठी नवीन संशोधन करणार्‍या ठाण्यातील रुही सय्यद या शिक्षिकेने असाच प्रयोग केल्याबद्दल त्यांचा केंद्र सरकारच्या वतीने गौरव करण्यात आला आहे. त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसने त्यांचा सत्कार केला.

रुही सय्यद या न्यू हारोयझन या शाळेमध्ये ज्ञानदानाचे कार्य करतात. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या वतीने दरवर्षी कोणत्याही प्रकारची भांडवली गुंतवणूक न करता शिक्षणामध्ये नवनवीन प्रयोग करणार्‍या शिक्षकांचा सन्मान करण्यात येत असतो. या सन्मानासाठी महाराष्ट्रातील सुमारे 4 हजार शिक्षकांनी आपले प्रकल्प केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयाच्या अखत्यारीत असलेल्या ‘झिरो इन्वेस्टमेंट इनोव्हेशन फॉर एज्युकेशन इनेशिटीव्हज्” या अभियानामध्ये सादर केले होते. त्यामध्ये महाराष्ट्रातील 10 शिक्षकांच्या प्रयोगांना मान्यता देण्यात आली असून या प्रकल्पामध्ये रुही सय्यद यांचाही समावेश आहे. नुकत्याच नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात रुही सय्यद यांचा सन्मान करण्यात आला.
त्याबद्दल गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांच्या आदेशानुसार शहराध्यक्ष आनंद परांजपे यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष विक्रम खामकर यांनी रुही सय्यद यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचा सत्कार केला. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे शहराध्यक्ष प्रफुल्ल कांबळे, राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर उपाध्यक्ष मंगेश तांबे, सामाजिक न्याय विभागाचे कार्याध्यक्ष रमेश दोडके, नासीर शेख, तुषार खोपकर, अभिषेक पुसाळकर, संजय साळुंखे, दिलीप यादव, विशाल खामकर आदी कार्यकर्ते उपस्थित होते. 


टिप्पण्या