दिव्यात मालमत्ता व पाणी पुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीदारांवर महापालिकेची मोठी कारवाई



८४ दुकाने सील तर ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित 

ठाणे(प्रतिनिधी) प्रत्येक प्रभाग समितीनिहाय दिलेल्या उद्दिष्ठानुसार मालमत्ता आणि पाणी पुरवठा कराची वसुली करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन  शर्मा यांनी दिल्यानंतर महापालिकेच्यावतीने विशेष मोहीम हाती घेण्यात आली असून दिवा प्रभाग समितीमधील थकबाकीदारांवर धडक कारवाई करण्यात आली आहे. दिव्यातील कर न भरणारी ८४ दुकाने व १० निवासी खोल्या सील करण्यात आल्या असून ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

 महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांच्या आदेशानुसार महानगरपालिकेच्यावतीने सन 2020-21 या आर्थिक वर्षातील मालमत्ता कर आणि पाणी देयकांची तसेच मागील थकबाकी वसुलीकरिता विशेष मोहीम सुरू आहे. मालमत्ता आणि पाणी कर वसुलीकरिता प्रभाग समितीनिहाय दैनंदिन उद्दिष्ठे देण्यात आली आहेत. दिवा प्रभाग समितीमध्ये कर वसुलीचे उद्दिष्ट गाठण्यासाठी उप आयुक्त अश्विनी वाघमळे, सहाय्यक आयुक्त महेश आहेर यांनी कर वसुलीकरिता धडक मोहिम हाती घेतली असून दिव्यातील थकबाकीदारांवर कठोर कारवाई करण्यात येत आहे.

 गेल्या चार दिवासांपासून दिव्यामधील कर न भरणारी दुकाने सील करण्यात आली असून सर्व थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजाविण्यात येत आहेत. तसेच पाणीपुरवठा कर न भरणाऱ्या थकबाकीधारकांचा पाणी पुरवठा खंडीत करण्यात येत आहे. दिनांक १४ डिसेंबर २०२० ते १७ डिसेंबर २०२० या कालावधीत दिव्यातील ८४ दुकाने आणि १० निवासी खोल्या सील करण्यात आल्या आहेत. ३७९ थकबाकीधारकांना डिमांड नोटीस बजाविण्यात आलेली असून ९२ थकबाकीदारांचा पाणी पुरवठा खंडित करण्यात आला आहे.

टिप्पण्या