छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात कोव्हीड-१९ रुग्णांसाठी 'प्लाझ्मा दान केंद्र' कार्यान्वित,कोरोनामुक्त दात्यांनी 'प्लाझ्मा दान' करण्याचे ठाणे महापालिकेचे आवाहन


ठाणे (प्रतिनिधी): कोव्हीड १९ रुग्णांवर प्लाझ्मा उपचार पद्धती वरदान ठरत असून ठाणे नगरीचे प्रथम नागरिक महापौर नरेश गणपत म्हस्के यांच्या सूचनेनंतर व महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या पुढाकाराने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कोव्हीड १९ रुग्णासाठी 'प्लाझ्मा दान केंद्र कार्यान्वित करण्यात आले असून कोरोनामुक्त दात्यांनी जास्तीत जास्त संख्येने 'प्लाझ्मा दान' करण्याचे आवाहन महापौर नरेश गणपत म्हस्के आणि महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी केले आहे.  


     कोरोनामुक्त रुग्णाच्या रक्तातील 'प्लाझ्मा'मध्ये प्रतिकार शक्ती (अॅन्टीबॉडी) असल्याने ते रुग्णाला कोरोनाबाधित रुग्णास दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होत असल्याने छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या रक्तपेढी विभागात कोव्हीड १९ रुग्णासाठी प्लाझ्मा दान केंद्र सुरु करण्यात आले आहे. सदरच्या कामासाठी मुख्यमंत्री सहायता निधी कोव्हीड १९ खात्यातून अर्थ सहाय्य मिळाले असून या सुविधेसाठी केंद्रीय आणि राज्य अन्न व औषध प्रशासन विभागाकडून परवानगी मिळालेली आहे.


      कोविड पासून बरे झालेल्या व्यक्तीची उपचारानंतर आरटी-पीसीआरची चाचणी निगेटिव्ह आल्यापासून २८ दिवसानंतर व ४ महिन्यापूर्वी पर्यंत त्या व्यक्ती प्लाझ्मा दान करू शकतात. कोरोना संसर्गातून बरे झालेल्या प्लाझ्मा दात्यांची चाचणी करण्यात येते. 'प्लाझ्मा'मध्ये प्रतिकार शक्ती (अॅन्टीबॉडी) योग्य प्रमाणात असल्यास त्यांचे प्लाझ्मा रुग्णाला दिल्यास त्याच्या शरीरात प्रतिकारशक्ती तयार होऊन रुग्ण बरा होण्यास मदत होते. दात्यांनी केलेले प्लाझ्मा दान कोव्हीड १९ रुग्णासाठी जीवनदान ठरू शकते. त्यामुळे प्लाझ्मा दान करण्यासाठी जास्तीत जास्त कोरोनामुक्त दात्यांनी पुढे यावे असे आवाहन महापालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.


       ठाणे परिसरातील सरकारी रुग्णालयातील कोव्हीड रुग्णांसाठी ही सेवा निशुल्क पुरवण्यात येत आहे. मात्र खाजगी रुग्णालयातील रुग्णासाठी ही सेवा शासकीय नियमानुसार शुल्क आकारून उपलब्ध करून देण्यात आली आहे. राजीव गांधी वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. भीमराव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली व रक्तपेढी विभाग प्रमुख डॉ. शिवकुमार कोरी यांच्या सहकार्याने रक्तपेढी विभागामार्फत प्लाझ्मा दान केंद्रातील ही सुविधा नागरिकांना उपलब्ध करुन देण्यात येत आहे.


टिप्पण्या