ठाणे शहरातील वाहतूक कोंडी समस्येचा महापालिका आयुक्त डाॅ.विपीन शर्मा यांनी घेतला आढावा
सेवा रस्ते मोकळे करण्याचे अधिकाऱ्यांना दिले आदेश
ठाणे (प्रतिनिधी) ठाण्यातील वाहतूक कोंडीची समस्या सोडविण्यासाठी ठाणे महानगरपालिका आणि वाहतूक पोलिस शाखा यांनी समन्वयाने काम करण्याची गरज असल्याचे सांगून पार्किंग, गतीरोधक, नो पार्किंग, नो एंट्री फलक लावणे तसेच रस्त्यावरील बेवारस वाहने हटविणे आदी कामांना प्राधान्य देण्याच्या सूचना महापालिका आयुक्त डॅा. विपिन शर्मा यांनी केल्या. त्याचबरोबर वाहतूक पोलिसांच्या मदतीने शहरातील सर्व सेवा रस्ते मोकळे करण्याचे आदेश परिमंडळ उप आयुक्त आणि सर्व सहाय्यक आयुक्त यांना दिले.
ठाणे शहरात वाहतूक कोंडीची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत असून वाहतूक कोंडीची समस्या कायमस्वरूपी सोडविण्यासाठी महापालिका आयुक्त डॉ.विपिन शर्मा यांनी आज वाहतूक पोलिस विभाग आणि महापालिका अधिका-यांसोबत आढावा बैठक घेवून वाहतूक कोंडी संदर्भातील अनेक गोष्टींवर प्रकाश टाकला.
यावेळी बोलताना महापालिका आयुक्त डॅा. शर्मा यांनी गतिरोधक टाकणे, शहरातील पार्किंग व्यवस्था, कार पार्किंग, नो पार्किंग, नो एंट्री बोर्ड लावणे, बेवारस वाहने, झेब्रा क्रॉसिंग तसेच सेवा रस्ते मोकळे करणे आदी महत्वाची कामे तात्काळ पूर्ण करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
ठाणे शहर झपाट्याने वाढत असून वाढत्या लोकसंख्येसॊबतच वाहनांची संख्या देखील वाढत आहे. वाढत्या वाहनांमुळे शहरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे. त्याचबरोबर स्थानिक नागरिकांकडून सेवा रस्ते मोकळे करण्याची मागणी वेळोवेळी होत आहे. संबंधित प्रभाग समितीत्यांच्या सहाय्यक आयुक्तांनी सदरचे सेवा रस्ते तात्काळ मोकळे करण्याचे आदेश दिले.
या बैठकीमध्ये महापालिका आयुक्त डॉ.शर्मा यांनी प्रभाग समितीनिहाय वाहतूक समस्येचा आढावा घेवून दुचाकी करिता पी १, पी २ साईंन बोर्ड, कार पार्किंग साईंन बोर्डन, नो पार्किंग,नो एंट्री बोर्ड लावणे, वाहतूक विभागाच्यावतीने उभारण्यात आलेल्या कंटेनरमध्ये शौचालयाची सोय, पिण्याच्या पाण्याची सोय, रस्त्यांवरील भंगार व बेवारस वाहने, फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतुक कोंडी, विविध ठिकाणी पार्किंगचे पिवळे व पांढरे पट्टे नव्याने मारणे, झेब्रा क्रॉसिंग, स्पॉट लाईट, गतिरोधक तसेच पे अँन्ड पार्क, टीएमटीबस स्टॉपवरील बसेस उभ्या करण्यासाठी बॉक्स तयार करणे आदी कामे तात्काळ करण्याचे निर्देश संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
या बैठकीस यावेळी वाहतूक पोलीस विभागाचे उपायुक्त बाळासाहेब पाटील, महापालिका अतिरिक्त आयुक्त(1) गणेश देशमुख यांच्यासह वाहतूक विभागाचे आणि महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा