ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएटस व युनिसेफ यांच्यावतीने ''वर्ल्ड हँडवॉश दिन'' साजरा
निबंध, चित्रकला,व रांगोळी स्पर्धांचे आयोजन
ठाणे( प्रतिनिध): मानवी आरोग्याच्या दृष्टीने वेळोवेळी हात स्वच्छ धुणे अत्यंत आवश्यक असून आज ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएटस व युनिसेफ यांच्यावतीने लोकमान्यनगर येथे ''वर्ल्ड हँडवॉश दिन'' साजरा करण्यात आला. यानिमीत्त लोकमान्यनगरमध्ये निबंध, चित्रकला, घोषवाक्य व रांगोळी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.
आपल्याला होणार्या अनेक आजारांचे मूळ हे आपल्या अस्वच्छ हातांमध्ये असते. अशुद्ध, अस्वच्छ हातांनी अन्नपदार्थ हाताळल्यामुळे, खाल्ल्यामुळे अनेक जीवाणू आपल्या पोटात जात असतात आणि त्यातून विविध प्रकारच्या आजारांना आमंत्रण मिळत असते. म्हणूनच हस्तशुद्धीबाबत जागृती करण्यासाठी जगभरात 15 ऑक्टोबर हा दिवस '' वर्ल्ड हँडवॉश दिन म्हणून साजरा केला जातो. निमित्ताने ' ठाणे महानगरपालिका, शेल्टर असोसिएटस व युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने आज लोकमान्यनगर या ठिकाणी ''वर्ल्ड हँडवॉश दिन'' दिन साजरा करण्यात आला.
सध्या पूर्ण जगभरात कोरोना आजाराने थैमान घातले आहे. या आजाराला रोखण्यासाठी प्रत्येकाने काळजी घेतली तरच कोरोनापासून आपण दूर राहू शकतो. हा साथीचा आजार असल्याने हाताद्वारे लगेच त्याची बाधा होण्याची शक्यता असते. त्यासाठी योग्य पद्धतीने आणि साबणाने हात धुतले पाहिजेत. सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शेल्टर असोसिएटस सेवाभावी संस्था युनिसेफसोबत शहरांमधील वस्त्यांमध्ये कोरोना कमी व्हावा यासाठी जनजागृतीचे काम करत आहे.
हात न धुतल्याने विविध आजारांना सामोरे जावे लागते. कोरोना काळात हात धुणे अतिशय महत्त्वाचे असून हात न धुतल्याने कोणते दुष्परिमाण होतात हात कसे धुतले पाहिजेत. आपल्या आरोग्याची काळजी कशी घेतली पाहिजे याबाबत डॉ. सुनिल घोडके यांनी मार्गदर्शन केले. शास्त्रीयदृष्ट्या किमान 20 सेकंद हात चोळून मग पाण्याने धुतले पाहिजेत. यामुळे जीवाणू आणि विषाणू पोटात जाण्यापासून बचाव होऊन कोरोना तसेच अनेक संसर्गजन्य रोग दूर ठेवण्यास मदत होते. आपली दैनंदिन स्वच्छता कशी करावी याबाबत टीम लीडर वैभव काळे यांनी मार्गदर्शन केले.
''वर्ल्ड हँडवॉश'' दिनानिमित्त' लोकमान्य नगर येथे रांगोळी स्पर्धा, चित्रकला स्पर्धा, निबंध स्पर्धा व घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.त्यानंतर वस्तीमधील मुलांना एकत्र येऊन सोशल डिस्टन्सचे पालन करून जनजागृतीपर कार्यक्रम, भाषण व गीते घेण्यात आली. या कार्यक्रमास स्थानिक नगरसेवक दिगंबर ठाकूर यांनी उपस्थित मुलांना हात धुणे संदर्भात मार्गदर्शन केले. यावेळी सीमा गावडे, अरविंद राठोड, ज्ञानेश्वर आडे, मेगा लोंढे, सिद्धांत चौगुले, अविनाश पवार व योगिता शिंदे आदी उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा