स्वातंत्र्यसैनिक काँग्रेस नेते उद्धवदादा घरत यांची शोकसभा
वसई (प्रतिनिधी) जेष्ठ स्वातंत्र्य सैनिक उद्धवदादा घरत यांची शोकसभा बुधवार दिनांक १४ ऑक्टोबर २०२० रोजी सायं. ४.३० वाजता काँग्रेस हाऊस, पारनाका, वसई येथे घेण्यात आली. उद्धवदादांना वृद्धापकाळामुळे सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर २०२० रोजी ९८ व्या वर्षी देवाज्ञा झाली होती.
प्रारंभी दीपप्रज्वलनाने शोकसभेची सुरुवात झाल्यानंतर वसई - विरार शहर जिल्हा काँग्रेस अध्यक्ष ओनिल आल्मेडा यांनी आपल्या प्रास्ताविकात उद्धवदादांच्या सर्व क्षेत्रातील योगदानाचा आढावा घेऊन आपण दादांच्याच आदर्श आणि मार्गदर्शनानुसार निष्ठेने पक्षाची सेवा व कार्य केले पाहिजे, हे विशद केले. अण्णासाहेब वर्तक महाविद्यालयाचे तसेच 'विद्यावर्धिनीचे' अध्यक्ष विकास न.वर्तक यांनी बोलताना दादांच्या अनेक गोष्टींना उजाळा देत त्यांच्यातील प्रामाणिक व निस्पृह कार्यकर्ता कायमचा मनात राहील अशी आदरांजली वाहिली. वसई - विरार शहर महानगरपालिकेचे माजी महापौर प्रवीण शेट्टी यांनी उद्धवदादांकडून आपण बरेच काही शिकलो, असे प्रतिपादन केले. श्री. विन्सेंट आल्मेडा यांनी दादांच्या एकूणच काम करण्याच्या पद्धतीवर बोलतांना आपण त्यांच्या काँग्रेस पक्षातील, विद्यावर्धिनी कॉलेज त्याचप्रमाणे वसई पीपल्स सोसायटीतील त्यांचे योगदान अनन्य साधारण होते असे म्हटले. शिवसेनेचे श्री.निलेश तेंडोलकर यांनी बोलताना दादांनी पक्षीय राजकारण करतांनाही आपले अजातशत्रुत्व कायम राखले व आपल्या आठवणी कथन केल्या. बबनशेठ नाईक यांनी, आपण एक निरपेक्ष वृत्तीने काम करणारा काँग्रेस नेता गमावला अशी भावना व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्रप्रदेश काँग्रेसचे डॉ.गजानन देसाई ह्यांनी आपण काँग्रेस कार्यकर्त्यांनी दादांचा आदर्श समोर ठेऊन निस्वार्थी सेवा करताना काँग्रेसची तत्व आणि अजेंडा लोकांपर्यंत नेणे हि खरी श्रद्धांजली होईल अशा भावना व्यक्त केल्या तसेच श्रीमती रोहिणी कोचरेकर, प्रा.ट्रीजा परेरा, शेखर धुरी, विलास चोरघे, छगनशेठ नाईक, सुरेश वर्तक आदींनी आपल्या भावना व्यक्त केल्या. त्याचबरोबर महाराष्ट्रप्रदेश काँग्रेसचे कार्याध्यक्ष श्री.मुझफ्फर हुसेन, जयवंत कवळी, मनोहर पाटील प्रभुतींचे ध्वनिमुद्रित व्हिडीओ संदेश ऐकविण्यात आले. तसेच विविध सामाजिक व सहकारी संस्थांनी पाठवलेले शोकसंदेश वाचण्यात आले. दादांच्या कुटुंबीयांतर्फे दादांचे चिरंजीव मोहन घरत ह्यांनी आपल्या कुटुंबीयांतर्फे सर्व सांत्वन करनाऱ्यांचे ऋण व्यक्त केले. सदर शोकसभेचे थेट प्रसारण यु ट्युब, केबलद्वारे करण्यात आले. श्री.संदीप फिगेर ह्यांनी औचित्यपूर्ण सूत्रसंचालन केले. सध्याच्या पार्श्वभूमीवर शासकीय नियमानुसार सामाजिक अंतर सभागृहात राखले गेले. वसाईभरातुन विविधपक्षीय कार्यकर्ते तसेच दादांचे हितचिंतक उपस्थित होते.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा