हातखंबा परिसरात पाळीव प्राण्यांवर लॅम्पी स्कीन रोगाचा प्रादुर्भाव
पशुवैद्यकीय अधिका-यांनी पथकासमवेत जनावरांचे केले यशस्वी लसीकरण
रत्नागिरी (प्रतिनिधी)रत्नागिरी येथील हातखंबा कार्यक्षेत्रात हातखंबा परिसरात पशुधनातील लॅम्पी स्कीन डिसीजचे एकूण आठ रुग्ण आढळून आले आहेत. लागण झालेल्या पशुधनामध्ये जनावरांना ताप येणे, चारा खाणे, पाणी पिणे याचे प्रमाण कमी होणे, त्वचेवर दहा ते पंधरा मिलिमीटर व्यासाच्या गाठी मान, डोके, कान इत्यादी ठिकाणी येणे, नाका तोंडावर व्रण येणे यासारखी लक्षणे दिसून येत आहेत.
सदर माहीती समजताच रत्नागिरी तालुका पशुसंवर्धन विभागाच्या वैद्यकीय अधिकारी डॉ अभिजित कसाळकर यांनी तातडीने भेट देऊन योग्य ती उपाययोजना करण्यात आली आहे. त्याकरिता डॉ.पुजारी, डॉ जंगम यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.अभिजित कसालकर यांनी विभागाचे कर्मचारी यांच्या पथकासमवेत योग्य तो औषधोपचार करुन लागण होण्याच्या प्रमाणावर वेळीच आळा घातला आहे. नुकतेच येथील पशुधनावर लसीकरण करण्यात आले असून घरनिहाय पशुधनाची नोंदणी व पाठपुरावा करण्याचे काम सुरु आहे. औषधोपचार केलेल्या जनावरांमध्ये पशुपालकांमधील भितीचे वातावरण दूर झाले आहे.
सदर जनावरांवर लसीकरण करत असताना जिल्हा उपायुक्त डॉ.सुभाष म्हस्के यांनी विशेष मार्गदर्शन केले. सदर रोगाबाबत रत्नागिरी जिल्हा परिषद बांधकाम व आरोग्य सभापती बाबू म्हाप, जिल्हा परिषद सदस्य कदम, पंचायत समिती सदस्या सौ. साक्षी रावणंग, आदींनी विशेष लक्ष घालून पशुपालकांशी चर्चा करुन रोगाबाबत माहीती करुन घेतली आहे.
सध्याच्या परिस्थितीत पुरेशा लसमात्रा उपलब्ध असल्याने सर्व पशुपालकांनी आपल्या पशुधनास लसीकरण करुन घ्यावे असे आवाहन पंचायत समिती सदस्या सौ.साक्षी रावणंग यांनी केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा