अवकाळी पावसात भातशेती व बागायती नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्या- ओनील आल्मेडा
जिल्हा काँग्रेसच्या पत्राची दाखल घेऊन पंचनाम्याच्या कामाला सुरुवात
वसई (प्रतिनिधी) : वसई विरार क्षेत्रात आणि वसई तालुक्यात अवकाळी पावसामुळे भात पिकांच्या आणि फुल बागायतींचे नुकसानीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्या अशी मागणी वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी वसईच्या तहसीलदार उज्ज्वला भगत यांनी लेखी पत्राद्वारे केली होती. याची गंभीर दखल घेत याबाबत भातशेतीच्या नुकसानीच्या पंचनाम्याचे काम प्राधान्याने सुरू असून शासनाच्या प्रचलित नियमानुसार कार्यवाही सुरू असल्याचे लेखी पत्र तहसीलदार यांनी काँग्रेस जिल्हाध्यक्ष आल्मेडा यांना दिले आहे.
अवकाळी पावसामुळे शेतात कापून पडलेले भात आणि कापणीस तयार झालेले पीक तसेच फुल बागायती पावसात भिजल्याने संपूर्ण वर्षाची मेहनत वाया जाऊन भातशेती आणि फुल बागायतदार शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झालेले आहे. त्यांचे अतोनात नुकसान झाल्यामुळे ते चिंतीत आहेत. परतीच्या अवकाळी पावसाचा मोठा फटका भातशेती आणि फुल बागायतीला बसला असून शेतकरी कुटुंबाचे जनजीवन विस्कळीत झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन या समस्यांवर तातडीने उपाययोजना आणि आवश्यक कार्यवाही करून बाधित शेतकऱ्यांना तात्काळ आर्थिक मदत करावी अशी विनंती जिल्हा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा यांनी वसईच्या तहसीलदार यांच्याकडे लेखी पत्राद्वारे केली होती.
अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या शेतकरी, बागायतदारांनी काँग्रेस भवन, पारनाका, वसई गाव येथे काँग्रेस जिल्हाध्यक्ष ओनील आल्मेडा, कार्याध्यक्ष प्रकाश पाटील व पदाधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा आवाहन केले आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा