सायंकाळी सातनंतर चालु ठेवणाऱ्या दुकानांवर ठाणे महानगरपालिकेची धडक कारवाई सुरु


ठाणे(प्रतिनिधी ): सायंकाळी सातनंतर उघड्या राहणाऱ्या सर्व आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिल्यानंतर काल प्रभाग समितीनिहाय शहरातील ७२ आस्थापनांवर धडक कारवाई करून आस्थापना सील करण्यात आल्या आहेत. दरम्यान यापुढेही सदरची कारवाई सुरु ठेवण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. शर्मा यांनी सर्व सहाय्यक आयुक्तांना दिले आहेत.


राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार सायंकाळी सातपर्यंत  सर्व आस्थापना सुरू ठेवण्याचे आदेश आहेत. महापालिकेनही तशा प्रकारचे आदेश जारी केले आहेत. तरीही काही आस्थापना सात नंतरही सुरू राहत असल्याच्या तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे सातनंतर ज्या आस्थापना उघड्या आहेत अशा आस्थापनांवर कारवाई करण्याचे आदेश महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिले आहेत. या पार्श्वभूमीवर शहरात कालपासूनच सातनंतर उघड्या राहणाऱ्या आस्थापनांवर धडक कारवाई सुरु आहे.


ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व प्रभाग समितीमध्ये सहाय्यक आयुक्त रोज सायंकाळी सात ते साडे सात या कालावधीत आपल्या प्रभागामध्ये फिरून  सुरू असणाऱ्या आस्थापना तसेच अन्न पदार्थाच्या स्टॅाल्सवर कारवाई करत असून काल  जवळपास ७२ आस्थापना सील करण्यात आल्या आहेत.


टिप्पण्या