राज्यातील उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदांना अनुदानासह मंजुरी देण्यात यावी-श्री बाळाराम पाटील


कोकण विभाग शिक्षक आमदार  बाळाराम पाटील यांची मागणी.


मुंबई(शांत्ताराम गुडेकर) विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांच्या अध्यक्षतेखाली शिक्षकांच्या विविध प्रश्नांबाबत सभेचे आयोजन विधानभवनात करण्यात आले होते.राज्यातील उच्च माध्यमिक शाळांतील २००३-०४ ते २०१८-१९ पर्यंतच्या वाढीव पदांना अनुदानासह मंजुरी तात्काळ देण्यात यावी अशी मागणी कोकण विभाग शिक्षक आमदार  बाळाराम पाटील यांनी केली. उच्च माध्यमिक शाळांतील वाढीव पदावर कार्यरत शिक्षक हे विना वेतन काम करीत असून अत्यंत हलाखीचे जीवन व्यतीत करीत आहेत.त्यामुळे शासनाने तात्काळ या संदर्भात सकारात्मक निर्णय घेऊन वाढीव पदांवर कार्यरत सर्व शिक्षकांना न्याय मिळवून द्यावा, असे आवाहन पाटील यांनी यावेळी केले.


       अनुदानित कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचा प्रश्न लवकरच निकाली काढण्याचे आश्वासन विधानसभा अध्यक्ष नानासाहेब पटोले यांनी असून राज्यातील उच्च माध्यमिक शाळांतील वाढीव पदांना अनुदानासह मंजुरी देण्यासाठी आवश्यक कार्यवाही पुढील १५ दिवसात करण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना नानासाहेब  पटोले यांनी दिल्याचे  बाळाराम पाटील यांनी सांगितले.लवकरच शासन राज्यातील उच्च माध्यमिक शाळेतील वाढीव पदांना अनुदानासह मंजुरी मिळून देण्याबाबत सकारात्मक निर्णय घेईल व विनावेतन काम करणाऱ्या शिक्षकांना न्याय मिळेल अशी अपेक्षा  बाळाराम पाटील यांनी व्यक्त केली.सदर बैठकीसाठी कोकण विभाग शिक्षक आमदार बाळाराम पाटील यांच्यासह आमदार प्रा.श्रीकांत देशपांडे, आमदार  दत्तात्रय सावंत, आमदार डॉ.सुधीर तांबे व महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.


टिप्पण्या