अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या पालघर जिल्ह्यातील शेतकरी व बागायतदार यांना नुकसान भरपाई देण्याची वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्षांची तहसीलदारांकडे मागणी


वसई (प्रतिनिधी) स्वत:च्या उदरनिर्वाहाबरोबर इतरांची अन्नधान्याची सोय करणाऱ्या शेतकऱ्याला अर्थात बळीराजाला लहरी हवामानावर अवलंबून रहावे लागत असल्याने निश्चित उत्पन्नाची शाश्वती नाही किंवा भरघोस पिक आले तरी पडेल भावाने विक्री करावी लागत आहे . यंदाच्या वर्षी जीवघेण्या कोरोना या महाभयानक विषाणूने जगभर थैमान घातले असल्याने त्याची ही टांगती तलवार डोक्यावर आहेच . अशा परिस्थितीत सुद्धा खंबीर पणे शेतात कष्ट करून प्रसंगी कर्ज काढून भातशेतीचे किंवा अन्य पिकांचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना / वागायतदारांना लहरी हवामानााचा फटका बसतोच आहे .


सरत्या मान्सून हंगामात अवकाळी पडलेल्या पावसाने पालघर जिल्ह्यातील वसई, जव्हार, वाडा, मोखाडा, तलासरी इत्यादी भागातून भातशेतीचे उत्पन्न घेणाऱ्या शेतकऱ्यांना तसेच वसईच्या पशिचम पट्टयातून वागायती, फुलशेती करणाऱ्या वागायतदारांना फटका बसला असून हातातोंडाशी आलेल्या भातशेतीच्या पिकाला मुकावे लागले आहे . पिढीजात व्यवसाय असलेल्या आणि केवळ याच उत्पन्नावर उदरनिर्वाह होत असलेल्या वसई तालुक्यातील शेतकरी व वागायतदार यांच्या पिकांच्या नुकसानीचे वसई तहसील कार्यालयामार्फत पंचनामे करून त्यांना त्वरीत नुकसान भरपाई मिळावी याकरीता वसई विरार जिल्हा युवक काँग्रेस अध्यक्ष कुलदीप वर्तक यांनी वसई तहसीलदार तसेच जिल्हाधिकारी, जिल्हा पालघर यांना दि . २८.९.२०२० रोजी पत्र पाठवले असून शेतकऱ्यांच्या पिकांच्या नुकसानीचे वेळीच पंचनामे करून त्यांना यथा योग्य नुकसान भरपाई देण्यात यावी व दिलासा द्यावा अशी या पत्राद्वारे मागणी केली आहे .


टिप्पण्या