राज्यातील शाळांतील विद्यार्थी पटसंख्या निश्चिती व पट नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात यावी - श्री तानाजी कांबळे
महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई अध्यक्ष श्री तानाजी कांबळे यांची शासन दरबारी मागणी
मुंबई - मार्च महिन्यापासून संपूर्ण महाराष्ट्रात कोरोना विषाणू ने थैमान घातले आहे. १५ जुन हा दिवस शाळा उघडण्याचा दिवस म्हणून आजतागायत ओळखला जातो, परंतु २०२० या वर्षात पहिल्यांदाच कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग पाहता व विद्यार्थ्यांचे आरोग्य हित लक्षात घेता १५ जून या दिवशी शाळा उघडल्या गेल्या नाहीत. शाळा बंद ठेवून शैक्षणिक वर्ष २०२०-२१ ची सुरुवात ही ऑनलाईन माध्यमातून करण्यात आली. ऑनलाईन शिक्षण सुरू करण्याचा स्वागतार्ह निर्णय राज्य शासनाने घेतला असल्याचे सचिव श्री. अलिमोद्दीन सय्यद यांनी सांगितले.
सध्याचा कोरोना विषाणूचा वाढता प्रसार पाहता शाळा कधी सुरू होतील, सांगता येणार नाही. शाळा जरी सुरू नसल्या तरी प्रवेश प्रक्रिया चालूच आहे. कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे प्रवेश प्रक्रियेस अनेक अडचणी निर्माण होत आहेत. अनेक पालक गावी असल्याने अजूनही विद्यार्थ्यांचा प्रवेश घेतलेला नाही. काही पालकांनी दाखले काढून घेतले आहेत, परंतु नवीन शाळेत प्रवेशच घेतलेला नाही. पटसंख्या वाढविण्यासाठी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी दरवर्षी प्रयत्न करीत असतात, परंतु यावर्षी ते ही शक्य होणार नाही. अश्या अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
दरवर्षी पटसंख्या निश्चिती, पट नोंदणीसाठी ३० सप्टेंबर ही मुदत ठरलेली असते. यावर्षीही पट संख्या निश्चितीसाठी ३० सप्टेंबर २०२० हीच तारीख निश्चित करण्यात आलेली आहे. मागील वर्षी पुर सदृश्य परिस्थितीमुळे पटसंख्या निश्चिती, पट नोंदणीसाठी मुदतवाढ देण्यात आलेली होती. यावेळी तर त्यापेक्षा ही भयंकर परिस्थितीचा आपण सामना करीत आहोत. त्यामुळे यावर्षी ही पटसंख्या निश्चिती, पट नोंदणीसाठी मुदतवाढ देणे हे राज्य शासनाची नैतिक जबाबदारी आहे, असे मत मुंबई अध्यक्ष श्री.तानाजी कांबळे यांनी व्यक्त केले.
राज्यातील सर्व शाळांना पट निश्चिती, पट नोंदणीसाठी मुदतवाढ मिळावी अशी मागणी महाराष्ट्र पुरोगामी शिक्षक संघटना मुंबई ने शासन दरबारी केलेली आहे. या बाबत विनंती निवेदन मा.मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री, मा.शिक्षणमंत्री, कोकण विभाग शिक्षक आमदार श्री बाळाराम पाटील, मा.शिक्षण सचिव, मा.शिक्षण उपसंचालक ( मुंबई ) यांना देण्यात आले असून मागणी पूर्ण होईपर्यंत याबाबत शासन दरबारी पाठपुरावा करणार असल्याचे कार्याध्यक्ष श्री. सतीश ठाकरे यांनी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा