भोजवाडी डुक्करकड्याजवळ खचलेल्या रस्त्याची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून पहाणी
निधी उपलब्ध झाल्यास लवकरच मोरीचे बांधकाम करणार
कोकण/रत्नागिरी (शांत्ताराम गुडेकर) गतवर्षी कोसळलेल्या मुसळधार पावसामुळे लांजा केळवली मार्गे भोजवाडी येथील डुक्करकडा जवळील रस्त्याच्या मोरीची डागडुजी अजूनही कायम असून येथील सामाजिक तथा आरटीआय कार्यकर्ते केतन भोज यांनी केलेल्या पत्रव्यवहारानंतर जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग लांजा यांना या खचलेल्या रस्त्याविषयी माहिती देऊन निधी उपलब्ध होताच या रस्त्याच्या खचलेल्या मोरीचे बांधकाम करू असे आश्वासन देत नुकतीच रस्त्याची पाहणी करण्यात आली आहे.
लांजा तालुक्यातील केळवली फाटा मार्गे भोजवाडीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्याची डुक्करकड्या जवळ गेल्या वर्षीच्या पडणाऱ्या मुसळधार पावसात रस्ताची मोरी खचून रस्त्याचा पूर्णपणे एकाबाजूचा प्रचंड भाग कोसळला होता.तेव्हा येथील स्थानिक ग्रामस्थ यांच्या मदतीने सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा यांनी तात्पुरती रस्त्याकडेलगतच्या खचलेल्या भागाची मलमपट्टी केली होती.मात्र आज वर्ष झाले तरीही याकडे कोणीही लक्ष देत नव्हते.त्यामुळे वाहन चालकांना तसेच येथील स्थानिक ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन येथून प्रवास करावा लागत होता ही गंभीर बाब आरटिआय व सामाजिक कार्यकर्ते केतन भोज(वृत्तपत्रलेखक/पत्रकार) यांच्या लक्षात येताच त्यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाचे उप अभियंता श्री.सावंत यांच्याशी दूरध्वनी संपर्क साधला.
भोज यांनी कल्पना दिल्यानंतर संबंधित विभागाकडून त्याठिकाणी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संबंधित कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली.परंतु याबाबतीत रस्त्याची पाहणी करण्यासाठी आलेल्या सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा यांच्या कर्मचाऱ्यांकडून भोज यांना सदर रस्त्याचे काम प्रधानमंत्री ग्रामसडक योजने मधून झाले असल्याचे सांगण्यात आले.त्यामुळे देखभाल व दुरुस्तीसाठी हा रस्ता जिल्हा परिषद सार्वजनिक बांधकाम विभाग लांजा यांच्या अंतर्गत येतो.त्यामुळे आमच्या विभागाकडून याबाबत जिल्हा परिषद बांधकाम उप विभाग लांजा यांना या खचलेल्या रस्त्याविषयी माहिती देतो.तसेच निधी उपलब्ध करून या रस्त्याच्या खचलेल्या मोरीचे बांधकाम करून घेऊ असे केतन भोज यांना आश्वासन देण्यात आले.
तरी सामाजिक कार्यकर्ते केतन भोज हे याबाबतीत पुढे आवश्यक तो पाठपुरावा करणार असून कोणत्याही स्थितीत या रस्त्याच्या खचलेल्या मोरीचे बांधकाम संबंधित विभागाकडून पूर्ण करून घेणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा