राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ- शरद पवार
नाशिक येथे कोरोना पार्श्वभूमीवर घेतली बैठक
नाशिक - राज्यात टेस्टिंग वाढवल्याने कोरोना रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. रुग्णांसाठी बेड्सची संख्या वाढवण्याच्यादृष्टीने आरोग्य खात्याकडून पुढील काही दिवसात महत्त्वपूर्ण पावले टाकण्यात येतील. त्यासाठी एक यंत्रणा तयार करण्यात आली आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी दिली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे नाशिक दौऱ्यावर असून काल त्यांनी कोरोना पार्श्वभूमीवर नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक घेतली.
नाशिकमधील वाढत्या कोरोना प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नियोजन भवन, नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय येथे झालेल्या बैठकीत जिल्ह्यातील कोरोना उपाययोजनांचा आढावा शरद पवार यांनी घेतला. तसेच त्यानंतर स्थानिक पत्रकारांशी संवादही साधला.
भारतात सध्या महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली आणि कर्नाटक या राज्यात रुग्णसंख्या वाढली आहे. महाराष्ट्राचा विचार केल्यास मुंबई, ठाणे, पुणे, कल्याण, डोंबिवली, नाशिक, सोलापूर, अकोला याठिकाणी कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. त्यातही मुंबई येथील स्थिती अधिक वाईट आहे. अनेक तज्ज्ञांनी आपल्याला येत्या काळात कोरोनासोबत जगावे लागेल, असे मत व्यक्त केले आहे. राज्यातील ज्या जिल्ह्यात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत त्या जिल्ह्यांतील सर्व प्रमुखांची बैठक घेऊन, समस्या जाणून त्यावर मार्ग काढण्याचा प्रयत्न असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मागील काही महिने कोरोनाशी लढण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे. प्रत्यक्ष घटनास्थळी जाऊन परिस्थितीचा आढावा घेऊन त्याचा अहवाल मुख्यमंत्र्यांना द्यावा हा प्रयत्न आहे. त्यादृष्टीने नाशिक जिल्हा आढावा बैठक घेण्यात आल्याचे शरद पवार म्हणाले.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा