केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं...दिव्यातील गटार सफाईची मनसेने केली पोलखोल


ठाणे (प्रतिनिधी) दिव्यातील सदगुरू वाडी, समर्थ नगर, प्रशांत कॉम्प्लेक्स इथे गटारांची साफसफाई महापालिकेकडून सुरू करण्यात आली, मात्र कंत्राटदाराकडून नालेसफाईच्या कामात धूळफेक सुरू असल्याचे मनसेच्या महाराष्ट्र सैनिकांनी उघडकीस आणले आहे.कामाच्या बाबतीत ठेकेदारांकडून केलं तर केलं नाहीतर तेल लावत गेलं...अशी परिस्थिती सध्या दिवा शहरातील गटार सफाई ठेकेदारांकडून पहावयास मिळत आहे.संपुर्ण कचरा गटाराच्या तळातच असल्याचे मनसैनिक श्री प्रशांत गावडे यांनी सांगितले आहे.


  गटारांची साफसफाई करताना फक्त सुरवातीच्या आणि शेवटच्या गटारांवरील झाकण उघडून गटारातील गाळ आणि कचरा काढला जातो मात्र दिव्यातील ठेकेदार मधली झाकणे ही गाळ आणि कचरा न काढता तशीच सोडली जातायत, काही ठिकाणी दोन दोन झाकणं सोडून गटारांची वरचेवर साफसफाई करण्यात आली आहे. गटारांची साफसफाई करण्यासाठी फावडे आणि इतर वस्तू मर्यादित स्वरूपात असल्याचे कंत्राटदारांच्या माणसांचे म्हणणे आहे.


दरवर्षी नालेसफाईच्या नावाने लाखो रुपयांची निविदा काढल्या जातात पण प्रत्यक्षात मात्र काम त्या पद्धतीचे होत नसल्याचे दिसून येत आहे. गेल्या वर्षी सदगुरू वाडी, प्रशांत कॉम्प्लेक्स, समर्थ नगर हा परिसर पहिल्याच पावसात पाण्याखाली होता. त्यावेळी तत्कालीन सहाय्यक आयुक्त श्री.महादेव जगताप साहेब यांनी स्वतः याची पाहणी केली होती. पण जर अशीच गटारांची साफसफाई होणार असेल तर गेल्यावर्षी प्रमाणे याही वर्षी इथल्या इमारती पहिल्याच पावसात पाण्याखाली जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे


दरम्यान मनसे तर्फे दिव्यातील रहिवाशांना आवाहन करण्यात आले आहे. आपल्या आजूबाजूच्या परिसरात सुरू असणाऱ्या गटारांच्या आणि नाल्यांच्या  साफसफाई व्यवस्थित करण्यासाठी एक जागरूक नागरिक म्हणून आपण लक्ष ठेवावे. कुठेही अशा प्रकारे धूळफेक होत असल्यास सोशल मिडीयाच्या माध्यमातून हा गैरप्रकार समोर आणावा.तसेच आमच्यापर्यंत पोहचवावा असे सांगण्यात आले आहे.


टिप्पण्या