जिल्ह्यात पुस्तकांचे सेट दाखल,मुलांना शाळेच्या पहिल्याच दिवशी मिळणार पुस्तके
रत्नागिरी : कोरोना संकटामुळे यंदाचे शैक्षणिक सत्र लांबण्याची शक्यता असली तरीही शाळा सुरु होताच पहिल्या दिवशी मुलांना पाठ्यपुस्तके मिळणार आहेत . त्यासाठी जिल्हा परिषद शाळा सज्ज झाल्या आहेत . प्राथमिक शाळांमधील मुलांना मोफत पुस्तके वाटप करण्यात येते . त्यासाठी जिल्ह्यात 6 लाख 71 हजार 495 पुस्तकांचे सेट दाखल झाले आहेत . त्यासाठी 2 कोटी 81 लाख 47 हजार 926 रुपयांचा निधी लागला . कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी पुरवण्यात आली आहेत . शाळांचे 2020 21 चे शैक्षणिक सत्र कधी सुरू होणार यावर निर्णय प्रलंबित ठेवण्यात आला आहे . तरीही शाळा सुरू करण्यासाठी आवश्यक तयारी करण्याच्या सूचना शिक्षण विभागाकडून दिल्या आहेत . त्यानुसार जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने पुस्तके आणि शाळेचा युनिफॉर्मसाठी आवश्यक ती मागणी शासनाकडे केली होती . त्यानुसार कोल्हापूर येथील एजन्सीकडून पुस्तके प्राप्त झाली आहेत . त्या - त्या तालुक्यातील विषयतज्ज्ञ आणि शिक्षक यांनी कोल्हापूर येथून पुस्तके आणण्याचे काम केले आहे . जिल्ह्यासाठी पावणेसात लाख विविध विषयांची पुस्तके लागणार होती . त्यानुसार 90 टक्के पुस्तके आणली गेली आहेत .
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा