हीच अमुची प्रार्थना' या प्रार्थनेतून 'गोगटे'कॉलेजच्या माजी विद्यार्थ्यांनी दिला 'सोशल' संदेश
https://youtu.be/38AwIxn9bSs - click here
कोरोना'ला घालवण्यासाठी व्हिडीओच्या माध्यमातून ईश्वरचरणी साकडे
रत्नागिरी (प्रतिनिधी) गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथून २००० साली पासआऊट झालेल्या माजी विद्यार्थ्यांनी 'कोरोना' व्हायरसचे जगातून समुळ उच्चाटन व्हावे आणि या संकटकाळात सर्वांचे मनोधैर्य स्थिर रहावे यासाठी 'हीच अमुची प्रार्थना' या प्रार्थनेच्या माध्यमातून ईश्वरचरणी साकडे घालत 'माणुसकीचे' आवाहन केले आहे.
आज या जागतिक महामारीशी आपण सगळेच लढत आहोत. मात्र सुरू असलेला लॉकडाऊन, येवू घातलेली आर्थिक मंदी...नोकर कपातीचे संकट...व्यवसाय बंद पडण्याची भिती आणि हे सगळं कधी सुरळीत होणार ? अशा मोठ्या प्रश्नांनी सगळ्यांना हैराण करून सोडलं आहे. याकाळात गरज आहे ती मानसिक तयारी आणि वैचारिक क्षमता स्थिर ठेवून, मनोधैर्य खचू न देण्याची...
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरी येथून २००० साली पदवी प्राप्त करुन बाहेर पडलेले मात्र सोशल मिडियाच्या माध्यमातून एकमेकांशी सातत्याने संपर्कात असलेले हे माजी विद्यार्थी या संकटकाळात व्हॉटसअप, फेसबुकच्या माध्यमातून पुन्हा एकत्र आले आणि त्यांनी समाजातील प्रत्येकाला 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' या संदेशाची पुन्हा आठवण करून दिली आहे.
पुणे येथील हॉटेल व्यावसायिक समीर भोसले आणि साम टीव्हीचे निवेदक, कार्यकारी निर्माते प्रशांत सागवेकर यांच्या संकल्पनेतून हा व्हिडिओ आकाराला आला आहे. या व्हिडिओला आकर्षक रुप मुंबईतील प्रसिद्ध व्हिडिओ एडिटर सुमित सुरेंद्र माने यांनी दिले आहे. सुमित माने हे सध्या सोनी टीव्हीशी संलग्न असून 'कौन बनेगा करोडपती' सारख्या अनेक प्रसिद्ध कार्यक्रमांचे ते व्हिडिओ एडिटर आहेत. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ते सुद्धा गोगटे जोगळेकर महाविद्यालयाच्या २००० बॅचचे विद्यार्थी आहेत.
या व्हिडिओमध्ये सहभागी असलेले रत्नागिरीतील प्रसिद्ध हॉटेल व्यावसायिक गणेश धुरी हे सध्या रत्नागिरीमध्ये क्वॉरनटाईन करण्यात आलेल्या रूग्णांना शिवभोजन थाळीच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे काम करीत आहेत तर अनेक वाड्या वस्त्यांतील गरीब गरजु नागरिकांना मोफत अन्न वाटपाचे देखील काम करीत आहेत. लांजा तालुक्यातील जावडे या गावी स्थित असलेल्या न्यु इंग्लिश स्कूल जावडेचे मुख्याध्यापक असलेले संदेश कांबळे हेदेखील या व्हिडिओमध्ये सहभागी आहेत. शिक्षणासोबत सामाजिक कार्यात पुढे असणारे संदेश कांबळे यांनी आपल्या सहकारी मित्रांच्या सहाय्याने गरीब व गरजुंना आवश्यक अन्नधान्याचे वाटप केले आहे.'आयबीएन लोकमत' बरोबरच 'मी मराठी' या प्रसिद्ध वृत्तवाहिनीसाठी काम केलेले आणि सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत पीआरओ असणारे संदीप कांबळे हे देखील आपल्याला या व्हिडिओमध्ये दिसतील. आवड म्हणून रत्नागिरी आणि आजुबाजुच्या परिसरात सामाजिक कार्यकर्त्या म्हणून काम करणाऱ्या अनघा आंबर्डेकर, अलिबाग आणि परिसरातील आदिवासी बांधवांना कलाकुसरीच्या माध्यमातून रोजगाराचा मार्ग दाखविणाऱ्या संगिता दामले जोशी, रत्नागिरीतील प्रसिद्ध अॅड. योगिनी सावंत, रत्नागिरीच्या पोलिस विभागात कार्यरत असलेले चेतन उतेकर, विरार येथील मीनल गोखले जोशी, रत्नागिरीतील आयसीआयसीआय प्रुडन्शियलचे वैभव पालकर, रोहा येथे शिक्षिका म्हणून कार्यरत असणाऱ्या अश्विनी आंबवकर हातखंबकर , रत्नागिरीमध्ये शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या नीता देवस्थळी, वर्षा संसारे, मीनल निकम, मीनल राऊळ, बेंगलोर या ठिकाणी वास्तव्याला असणाऱ्या आणि रत्नागिरीतील खेडेकर ज्वेलर्स यांच्या कन्या गायत्री खेडेकर असे रत्नागिरीशी नाळ जोडलेले अनेकजण या व्हिडिओमध्ये सहभागी झाले आहेत.
गोगटे जोगळेकर महाविद्यालय रत्नागिरीच्या या माजी विद्यार्थ्यांनी याअगोदर फोटोतून संदेश दिलाच आणि आता पुन्हा एकदा सोशल मिडियाच्या माध्यमातून एकत्र येत दिलेला हा 'माणसाने माणसाशी माणसासम वागणे' सांगत माणुसकीचा संदेश दिला आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा