पावसाळ्यापुर्वी दिव्यातील खोदकाम केलेली अर्धवट कामे कमी कामगार संख्येत पुर्ण करा – मनसेचं आयुक्तांना पत्र
ठाणे (प्रतिनिधी) कोरोना विषाणुमुळे ठाणे महानगरपालिकेतील सर्वच चालू कामे अर्धवट राहील्यामुळे विकासकामांना खिळ बसली आहे.गेल्या अनेक वर्षांच्या कालावधीनंतर ठाणे महानगरालिकेच्या दिवा प्रभाग समितीत सर्वाधिक कामे चालू होती.ठिकठिकाणी गटारे,रस्ते,पाण्याच्या लाईन्स आदी कामांमुळे मोठ्या प्रमाणात खोदकाम झाले आहे.त्यामुळे रस्त्यांची विद्रुपता निर्माण झाली आहे.जर ही कामे पावसाळ्यापुर्वी पुर्ण नाही झाली तर मोठी रोगराई पसरण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.भविष्यात साथिच्या आजाराला निमंत्रण मिळू शकते म्हणून मनसेचे दिवा उपविभाग अध्यक्ष श्री प्रशांत गावडे यांनी ठामपा आयुक्त विजय सिंघल यांच्याकडे कमी कामगार संख्येत कामे चालू करण्याची मागणी केली आहे.
दिवा प्रभाग समिती क्षेत्रातील काही भागांमध्ये ठाणे महापालिकेच्या माध्यमांतून काही महिन्यांपूर्वी रस्त्यांची, आणि गटारांच्या कामाची सुरुवात करण्यात आलेली होती. दिवा आगासन रस्ता, बि.आर.नगर यासारख्या ठिकाणी मुख्य रस्त्याच्या मधोमध खोदकाम करून गटारांची आणि पाण्याची लाईन टाकण्याचे काम सुरु होते हे काम अर्ध्यापर्यंत पोहचल्यानंतर कोरोना सारख्या आजाराने आपल्या इथे थैमान घालायला सुरुवात केली.त्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ही सर्व विकासकामे अर्धवट स्थितीत बंद करण्यात आली. हे असे करणे त्यावेळी गरजेचे होते यात कोणाचेही दुमत असण्याचे कारण नाही, मात्र आता लॉक डाऊन होऊन जवळपास एक महिना उलटून गेलेला आहे आणि त्यामुळे कामासाठी जिथे खोदकाम करण्यात आलेले आहे तिथल्या नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दिवा - आगासन रस्ता एका बाजूने अर्धा खोदलेल्या अवस्थेत आहे, बी.आर.नगरचा रस्ता जिथे मुख्य रस्त्याला जोडला जातो तो पूर्णपणे उखडण्यात आलेला आहे.
दोन दिवसात मे महिन्याला सुरवात होईल आणि नंतर १५ जून पासून पावसाळा सुरू होईल. दिव्यात दरवर्षी पावसाळ्यात दिवेकर नागरिकांना मोठ्या त्रासाला सामोरे जावेच लागणार आहे.मात्र ही सुरू असलेली कामे पावसाळ्यापर्यंत अशीच अर्धवट स्थितीत राहिली तर पावसाळा संपेपर्यंत पुढचे चार महिने लोकांना हा त्रास खूप मोठ्या प्रमाणात सहन करावा लागणार आहे. यासाठी मनसेचे दिवा उपविभाग अध्यक्ष प्रशांत गावडे यांनी पत्राद्वारे कल्याणच्या पत्री पूल आणि डोंबिवली पुलाचे काम ज्या पद्धतीने कोरोनाच्या काळात सर्व आवश्यक ती खबरदारी घेऊन सुरू आहे त्याच धर्तीवर दिव्यातील अर्धवट विकासकामे पावसाळा सुरू होण्यापूर्वी जर का पूर्ण करण्यासाठी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त श्री विजय सिंगल यांच्याकडे पत्राद्वारे मागणी केली आहे.
टिप्पण्या
टिप्पणी पोस्ट करा